कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 11:15 IST2025-10-25T11:14:32+5:302025-10-25T11:15:12+5:30
या वादामुळे ट्रम्प यांनी कॅनडासोबत सुरू असलेली महत्त्वपूर्ण व्यापार कराराची चर्चा तात्काळ थांबवली आहे.

कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या भाषणातील शब्दांची मोडतोड करून कॅनडाच्या एका प्रांतीय सरकारने जाहिरातबाजी केल्यामुळे, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चांगलेच संतापले आहेत. ओंटारियो प्रांताने प्रायोजित केलेल्या या 'अँटी-टॅरिफ' जाहिरातीवर ट्रम्प यांनी 'फेक' असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या वादामुळे ट्रम्प यांनी कॅनडासोबत सुरू असलेली महत्त्वपूर्ण व्यापार कराराची चर्चा तात्काळ थांबवली आहे.
काय आहे नेमका वाद?
अमेरिका आणि कॅनडा यांच्यात व्यापार करारावर चर्चा सुरू असतानाच, कॅनडातील ओंटारियो प्रांताच्या सरकारने एक मिनिटाची जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीत रोनाल्ड रीगन यांच्या १९८७ मधील 'मुक्त आणि निष्पक्ष व्यापार' या वरील एका रेडिओ भाषणातील काही भाग वापरण्यात आले आहेत.
जाहिरातीमध्ये काय दाखवले?
या जाहिरातीत रोनाल्ड रीगन यांचा आवाज ऐकू येतो. ते म्हणतात की, "टॅरिफ प्रत्येक अमेरिकन व्यक्तीचे नुकसान करतात आणि यामुळे अनिवार्यपणे इतर देशांकडून प्रतिशोध आणि तीव्र व्यापार युद्धे सुरू होतात."
रीगन यांचे हे शब्द खरे असले तरी, जाहिरातीमध्ये हे अशाप्रकारे 'रि-अरेंज' केले गेले आहेत की, त्याचा अर्थ विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाय-टॅरिफ धोरणांवर थेट टीका करणारा वाटतो. अनेक तज्ज्ञांनी याला ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांवर कॅनडाचा थेट हल्ला मानले आहे.
शब्दांशी कशी केली गेली छेडछाड?
रीगन यांचे मूळ भाषण साधारण पाच मिनिटांचे होते. जाहिरातदारांनी त्या भाषणातील शब्दांचा क्रम बदलून त्यांचा संदर्भ पूर्णपणे बदलला.
मूळ भाषणात काय होते?
रोनाल्ड रीगन जपानच्या व्यापार धोरणांविरुद्ध आपला विरोध स्पष्ट करत असताना म्हणाले होते की, काही विशिष्ट परिस्थितीत तात्पुरते टॅरिफ योग्य असू शकते, कारण अमेरिका संरक्षणवादी कायद्यांना पूर्णपणे विरोध करत नाही.
मात्र, जाहिरातीत रीगन यांचे 'टॅरिफ प्रत्येक अमेरिकन व्यक्तीला नुकसान पोहोचवतात' हे वाक्य भाषणाच्या सुरुवातीला ठेवण्यात आले. तसेच, रीगन यांनी संरक्षणवादी कायद्यांना नकार देण्याबद्दल केलेले विधान जाहिरातीच्या शेवटी टाकून, संपूर्ण संदेश टॅरिफ-विरोधी असा तयार करण्यात आला. यातून जणू रीगन यांनी हाय-टॅरिफ धोरणांचा सरळ विरोध केला होता, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.
ट्रम्प यांचा संताप!
कॅनडाच्या या कृतीने डोनाल्ड ट्रम्प चांगलेच संतापले. त्यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' अकाऊंटवर जाहिरातीची तीव्र निंदा केली आणि ती 'फेक' असल्याचे म्हटले. ट्रम्प यांनी लिहिले, “रीगन हे एक देशभक्त होते, ज्यांनी अमेरिकेला नेहमी प्राधान्य दिले. ते जागतिकीकरणवाद्यांचे प्रवक्ते नव्हते.” कॅनडा आपल्या राजकीय हेतूंसाठी एका अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या वारशाचा शस्त्र म्हणून वापर करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
केवळ ट्रम्पच नव्हे, तर 'रोनाल्ड रीगन प्रेसिडेंशियल फाउंडेशन'नेही या जाहिरातीवर चिंता व्यक्त केली आहे. फाउंडेशनने स्पष्ट केले की, जाहिरातीने माजी राष्ट्राध्यक्षांच्या भाषणाचा संदर्भ चुकीच्या पद्धतीने मांडला आहे. या वादामुळे अमेरिकेने कॅनडासोबतची व्यापार चर्चा त्वरित थांबवण्याचा निर्णय घेतला असून, दोन्ही देशांमधील संबंधात यामुळे तणाव वाढला आहे.