काय आहे 'डूरंड लाईन'? ज्या १३३ वर्ष जुन्या वादामुळे पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पेटलंय युद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 17:15 IST2026-02-27T17:11:08+5:302026-02-27T17:15:33+5:30
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन मुस्लिम राष्ट्रांमधील या भीषण संघर्षाच्या मुळाशी आहे १३३ वर्षांपूर्वी ओढलेली एक शापित रेषा, जिला जग 'डूरंड लाईन' म्हणून ओळखतं.

काय आहे 'डूरंड लाईन'? ज्या १३३ वर्ष जुन्या वादामुळे पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पेटलंय युद्ध
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर सध्या बंदुकांच्या गोळ्या आणि तोफांचे गोळे बरसत आहेत. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या भीषण चकमकीनंतर दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध 'खुल्या युद्धा'ची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तर आता आमचा संयम संपल्याचे जाहीर केले आहे. पण, या दोन मुस्लिम राष्ट्रांमधील या भीषण संघर्षाच्या मुळाशी आहे १३३ वर्षांपूर्वी ओढलेली एक शापित रेषा, जिला जग 'डूरंड लाईन' म्हणून ओळखतं.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
काय आहे डूरंड लाईन?
ही सीमा रेषा १८९३ मध्ये तयार करण्यात आली होती. त्यावेळी भारतात ब्रिटीशांचे राज्य होते. ब्रिटीश सरकारचे परराष्ट्र सचिव सर हेन्री मोर्टिमर डूरंड आणि अफगाणिस्तानचे तत्कालीन अमीर अब्दुर रहमान खान यांच्यात १२ नोव्हेंबर १८९३ रोजी एक करार झाला. या करारानुसार सुमारे २६४० किलोमीटर लांबीची ही सीमा निश्चित करण्यात आली, जी पश्चिमेला इराणपासून पूर्वेला चीनच्या सीमेपर्यंत जाते.
पश्तून समुदायाचे झाले दोन तुकडे
ब्रिटीशांनी ही रेषा स्वतःच्या संरक्षणासाठी आणि रशियाला रोखण्यासाठी 'बफर झोन' म्हणून तयार केली होती. मात्र, ही रेषा ओढताना तिथल्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीचा विचार केला गेला नाही. या रेषेने एकाच रक्ताच्या, एकाच संस्कृतीच्या आणि एकाच भाषेच्या 'पश्तून' समुदायाला दोन देशांत विभागले. एकाच कुटुंबातील एक भाऊ अफगाणिस्तानात तर दुसरा पाकिस्तानात अशी अवस्था झाली. त्यामुळेच अफगाण जनतेने ही सीमा कधीच मनापासून स्वीकारली नाही.
इतिहासातील कडू आठवणी
१९१९ चा करार: तिसऱ्या अँग्लो-अफगाण युद्धानंतर अफगाणिस्तानने ही सीमा मान्य केली होती, पण नंतर ती फेटाळून लावली.
१९४७ चा विरोध: जेव्हा पाकिस्तानची निर्मिती झाली, तेव्हा अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या युएन प्रवेशाला विरोध केला होता, कारण त्यांना डूरंड लाईन मान्य नव्हती.
२०१७ ची कुंपण भिंत: पाकिस्तानने या सीमेवर कुंपण घालण्यास सुरुवात केली, ज्याला तालिबानने कडाडून विरोध केला.
आज युद्ध का पेटले आहे?
सध्याच्या संघर्षाचे मुख्य कारण म्हणजे 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान'. पाकिस्तानचा आरोप आहे की, अफगाण तालिबान टीटीपीला आश्रय देत असून तेथून पाकिस्तानात हल्ले केले जात आहेत. तर, अफगाणिस्तानचे म्हणणे आहे की, पाकिस्तान विनाकारण त्यांच्या भूमीवर एअरस्ट्राइक करत आहे. या वादातूनच तालिबानने पाकिस्तानच्या १९ लष्करी चौक्यांवर ताबा मिळवल्याचा दावा केला असून ५५ पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचे वृत्त आहे.
पुढील धोका काय?
हा वाद केवळ दोन देशांपुरता मर्यादित नाही. जर, हे युद्ध वाढले तर संपूर्ण दक्षिण आशियात दहशतवादाचा धोका वाढू शकतो, ज्याचा परिणाम भारतावरही होऊ शकतो. कतार आणि तुर्कीसारखे देश मध्यस्थीचा प्रयत्न करत आहेत, परंतु १३३ वर्षांपासून चालत आलेला हा सीमावाद सहजासहजी मिटेल असे चिन्हे दिसत नाहीत. डूरंड लाईन ही केवळ एक नकाशावरची रेष नसून, ती एक अशी जुनी जखम आहे, जी वेळोवेळी भळभळते आणि दोन्ही बाजूंचे रक्त सांडते.