पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:50 IST2025-07-02T11:48:50+5:302025-07-02T11:50:11+5:30
जेव्हा या अधिकाऱ्यांचा पासपोर्ट जारी केला तेव्हा या गंभीर गोष्टीचा खुलासा झाला. या दौऱ्यातील कागदपत्रानुसार अधिकाऱ्यांनी त्यांची ओळख मेडिकल कोअर सदस्य म्हणून केली होती.

पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
पाकिस्तानी सैन्याचे ३ ब्रिगेडिअर जनरल्स नदीम अहमद, मोहम्मद नदीम तल्हा आणि सऊद अहमद राव २८ जून २०२५ रोजी बांगलादेशची राजधानी ढाका येथे पोहचले. हा दौरा अतिशय गुप्त ठेवला होता. या अधिकाऱ्यांची ओळख मेडिकल कोअर सदस्य म्हणून करण्यात आली. पाकिस्तानी सैन्याचे ३ बडे अधिकारी ओळख लपवून बांगलादेशात पोहचल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. या सर्वांचे आगमन एमीरेट्स एअरलाईन्सच्या फ्लाईटने झाले. त्यानंतर त्यांना ढाका येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबवण्यात आले होते.
जेव्हा या अधिकाऱ्यांचा पासपोर्ट जारी केला तेव्हा या गंभीर गोष्टीचा खुलासा झाला. या दौऱ्यातील कागदपत्रानुसार अधिकाऱ्यांनी त्यांची ओळख मेडिकल कोअर सदस्य म्हणून केली होती. पत्रकार आणि गुप्तचर संस्थांनुसार ते तिघेही पाकिस्तानी ISI शी निगडीत अधिकारी होते. सर्वात आश्चर्यकारक म्हणजे बांगलादेश सरकारने या अधिकाऱ्यांचे रेड कार्पेट स्वागतच केले नाही तर त्यांच्यासाठी दक्षिण क्षेत्रातील कॉक्स बाजारात बांगलादेशी सैन्याची १० वी इन्फ्रंटी डिविजनचा दौरा आयोजित केला. हा दौरा महत्त्वाचा होता कारण कॉक्स बाजार म्यानमारच्या सीमेजवळील भाग आहे.
तर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा बांगलादेशाच्या माध्यमातून अराकान लष्कराला सैन्य मदत पोहचवते. बांगलादेशात युनूस सरकार ISI अधिकाऱ्यांना मदत करत आहे. या हालचालींमुळे भारताच्या पूर्वेकडील राज्यात सुरक्षा धोरण, चीन-म्यानमार नीती, दक्षिण आशियातील राजकीय गणिते हे दिसून येतात असं ज्येष्ठ पत्रकार सलाह उद्दीन शोएब चौधरी यांनी म्हटलं.
दरम्यान, अलीकडेच बांगलादेशात लेफ्टिनंट जनरल अबु तैयब मोहम्मद जहीरूल आलम यांची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. जहीरूल आलमवर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI चा हस्तक आणि भारताविरोधी भावना भडकवण्याचा आरोप आहे. त्यांचे नाव बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या भावाशीही जोडले गेले आहे ज्याच्यावर भारताच्या पूर्वोत्तर राज्यात कट्टरपंथी विचारांना समर्थन देण्याचा आरोप आहे. जहीरूल आलम यांच्या नियुक्तीने बांग्लादेश आणि भारताचे संबंध आणखी बिघडण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.