बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 20:00 IST2025-10-06T19:54:18+5:302025-10-06T20:00:02+5:30
Israel Hamas begins talks in egypt: इस्रायल, हमास आणि अमेरिकेचे प्रतिनिधी इजिप्तमध्ये एकत्र चर्चा करणार आहेत

बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
Israel Hamas begins talks in egypt: इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी इजिप्तमधील शर्म अल-शेख रिसॉर्ट येथे चर्चा सुरू होणार आहे. या चर्चेमध्ये इस्रायल, हमास आणि अमेरिकेचे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यासाठी ही चर्चा केली जाणार आहे.
बैठकीत कोण कोण सहभागी होणार?
एका वरिष्ठ इजिप्त अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ या चर्चेचे नेतृत्व करणार आहेत. ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर हेदेखील या चर्चेसाठी इजिप्तमध्ये पोहोचले आहेत. कुशनर या चर्चेत कधी सहभगी होतील, याची कल्पना देण्यात आलेली नाही. या चर्चेत खलील अल-हया हे हमासच्या बाजूने नेतृत्व करत आहेत आणि बेंजामिन नेतान्याहू यांचे जवळचे विश्वासू सहकारी रॉन डर्मर हे इस्रायलचे नेतृत्व करणार आहेत.
ट्रम्प यांच्या शांतता योजनेतील महत्त्वाचे मुद्दे-
- युद्धबंदी तात्काळ लागू होईल.
- हमास ७२ तासांच्या आत त्यांच्या ताब्यात असलेल्या ४८ ओलिसांना सोडेल.
- इस्रायल महिला आणि मुलांसह २५० पॅलेस्टिनी कैद्यांना सोडेल.
- जोपर्यंत हमास आपली शस्त्रे टाकत नाही, तोपर्यंत इस्रायली सैन्य गाझामधून माघार घेणार नाही.
- गाझामध्ये एक आंतरराष्ट्रीय प्रशासन स्थापन केले जाईल, ज्यामध्ये ट्रम्प आणि माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.
- गाझामध्ये हमासची कोणतीही प्रशासकीय भूमिका राहणार नाही. त्यांची सर्व लष्करी पायाभूत सुविधा नष्ट केली जाईल.
हमास शस्त्र टाकण्यास तयार नाही
हमासने ओलिसांच्या सुटकेसाठी आणि इतर मुद्द्यांवर सहमती दर्शविली आहे, परंतु शस्त्रे टाकण्यात त्यांनी सहमती दर्शविली नाही. तथापि, इस्रायलची प्राथमिक मागणी म्हणजे हमासने शस्त्रे टाकून द्यावीत. हमासने प्रशासन स्वतंत्र पॅलेस्टिनी संस्थेकडे सोपविण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच, ट्रम्प यांच्या योजनेचा पहिला टप्पा अंमलात आणण्यास इस्रायल तयार आहे, परंतु युद्ध संपवण्यासाठी हमासला शरणागती पत्करावी लागेल आणि शस्त्रे सोडावी लागतील, असे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे.