आखातात रात्रभरात काय घडले? इराणने कुवेत, कतर, इस्रायलसह बहरीनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला; इस्रायलचा तेहरानमधील सरकारी टीव्ही मुख्यालयावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 06:11 IST2026-03-03T06:10:32+5:302026-03-03T06:11:00+5:30
Iran missiles, Middle East war news update: इराण-इस्रायल युद्धात आता कुवेत, कतार आणि बहरीन ओढले गेले आहेत. इराणने डागलेली ७० हून अधिक क्षेपणास्त्रे बहरीनने पाडली. इस्रायलचा तेहरानमधील सरकारी टीव्हीवर मोठा एअर स्ट्राईक. वाचा सविस्तर अपडेट्स.

आखातात रात्रभरात काय घडले? इराणने कुवेत, कतर, इस्रायलसह बहरीनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला; इस्रायलचा तेहरानमधील सरकारी टीव्ही मुख्यालयावर हल्ला
मध्य-पूर्वेतील युद्ध आता निर्णायक आणि अत्यंत विनाशकारी वळणावर पोहोचले आहे. इराणने आपले लक्ष्य विस्तारत आता कुवेत, कतर आणि बहरीन यांसारख्या शेजारील देशांवरही क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वर्षाव सुरू केला आहे. दुसरीकडे, इस्रायलने थेट इराणची राजधानी तेहरानमधील सरकारी टीव्ही मुख्यालय उडवून देऊन इराणची संवाद यंत्रणा खिळखिळी केली आहे.
कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणकडून डागलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोनची एक मोठी खेप कुवेतच्या हवाई क्षेत्रात दिसून आली. कुवेती सशस्त्र दलांनी तातडीने प्रत्युत्तर देत ही आक्रमणे रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. दुसरीकडे, कतारने दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे त्यांच्या हद्दीत प्रवेश करण्यापूर्वीच हवेतच नष्ट केली आहेत. कतारची राजधानी दोहाच्या आकाशात आजही भीषण स्फोटांचे आवाज ऐकू येत असून तिथल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बहरीनची मोठी कारवाई
बहरीनने दावा केला आहे की, त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीने इराणची ७० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ५९ ड्रोन पाडले आहेत. नागरी वस्त्यांवर होणाऱ्या या हल्ल्यांचा बहरीनने तीव्र निषेध केला आहे.
तेहरानमध्ये इस्रायली एअर स्ट्राईक
इस्रायली हवाई दलाने तेहरानमधील इराणच्या सरकारी टीव्ही मुख्यालयावर डझनावारी बॉम्ब टाकून ते उद्ध्वस्त केले आहे. इराण सरकारचा प्रचार आणि संवाद रोखण्यासाठी हा हल्ला केल्याचे इस्रायलने म्हटले आहे. शनिवारपासून सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात आतापर्यंत किमान ५५५ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणी रेड क्रिसेंटने दिली आहे. लेबनॉनमधील बैरूत येथे इस्रायलने केलेल्या हल्ल्यात 'पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद'चा टॉप कमांडर आदहम अदनान अल-ओथमैन मारला गेला आहे.
इस्रायलमध्ये धोक्याची घंटा
इराणने थेट इस्रायलच्या दिशेनेही अनेक क्षेपणास्त्रे डागली आहेत. यामुळे संपूर्ण इस्रायलमध्ये क्षेपणास्त्र सायरन वाजत असून नागरिकांना तातडीने बंकर्स आणि सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इस्रायलची 'आयरन डोम' आणि 'आयरन बीम' ही संरक्षण यंत्रणा या हल्ल्यांना रोखण्यासाठी सक्रिय करण्यात आली आहे, तरीही रात्रभर सोशल मीडियावर इस्रायलवर इराणी मिसाईल पडतानाचे व्हिडीओ व्हायरल होत होते.