कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 09:02 IST2025-12-04T08:46:53+5:302025-12-04T09:02:11+5:30
कर्ज आणि आर्थिक संकटात बुडालेला पाकिस्तान, आयएमएफच्या अटींनुसार आपली राष्ट्रीय विमान कंपनी पीआयए विकण्याची तयारी करत आहे. बनावट परवाना घोटाळा, विमान अपघात, प्रचंड गैरव्यवस्थापन आणि अब्जावधींचे नुकसान यामुळे पीआयए नुकसानीत असल्याची माहिती समोर आली आहे.

कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
पाकिस्तान मागील अनेक महिन्यांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. आयएमएफकडे कर्जासाठी पाकिस्तानने प्रयत्न केले होते, आता आयएमएफ समोर पाकिस्तान सरकारने गुडघे टेकल्याचे दिसत आहे. आयएमएफच्या दबावाखाली पाकिस्तानला आता त्यांची राष्ट्रीय विमान कंपनी, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) ही कंपनी विकावी लागणार आहे. पायलट परवाना घोटाळा, सुरक्षा निर्बंध आणि भ्रष्टाचारामुळे एअरलाइनची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. यामुळे सरकारला एअरलाइनचे खाजगीकरण करावे लागणार आहे.
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी बोली लावणाऱ्या कंपन्यांशी भेट घेतली. पीआयएसाठी बोली लावण्याची प्रक्रिया २३ डिसेंबर २०२५ रोजी सुरू होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. याचे देशभर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. खाजगीकरणाच्या शर्यतीसाठी चार कंपन्यांनी पूर्व-पात्रता मिळवली आहे, यामध्ये लष्कराच्या नियंत्रणाखालील फौजी फाउंडेशनचा भाग असलेल्या फौजी फर्टिलायझर कंपनीचा समावेश आहे.
आयएमएफने अटी ठेवल्या
पाकिस्तानी माध्यमांनुसार, 'पीआयए'मध्ये ५१-१००% विक्री ही आयएमएफने ७ अब्ज डॉलर्सच्या आर्थिक पॅकेजसाठी ठेवलेल्या अटींचा एक भाग आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीआयएची विक्री ही आयएमएफच्या बेलआउट पॅकेजची एक महत्त्वाची अट आहे. पाकिस्तानचे खाजगीकरण मंत्री मोहम्मद अली यांनी गेल्या महिन्यात रॉयटर्सला सांगितले की, "या वर्षी खाजगीकरणातून ८६ अब्ज रुपये महसूल मिळवण्याचे आमचे लक्ष्य आहे. पीआयएसाठी बोली लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि १५% महसूल सरकारकडे जाईल. उर्वरित रक्कम कंपनीकडेच राहील."
चार कंपन्यांनी पूर्व-पात्रता मिळवली
पीआयएच्या विक्रीसाठी चार बोलीदारांनी पूर्व-पात्रता मिळवली आहे. यामध्ये लकी सिमेंट कन्सोर्टियम, आरिफ हबीब कॉर्पोरेशन कन्सोर्टियम, एअर ब्लू लिमिटेड आणि फौजी फर्टिलायझर कंपनी लिमिटेड यांचा समावेश आहे. फौजी फर्टिलायझर कंपनी ही लष्कर-नियंत्रित फौजी फाउंडेशनचा भाग आहे. फौजी फाउंडेशन पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांपैकी एक कंपनी आहे.
पाचवा सर्वात मोठा कर्जदार देश
पीआयएचे निर्गुंतवणूकीकरण पाकिस्तानसाठी महत्त्वाचे आहे, कारण ते कर्जाचे पुनर्वित्त करण्यासाठी कर्ज घेते. अनेक वर्षांच्या आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे, २०२३ मध्ये पाकिस्तान कर्ज बुडवण्याच्या मार्गावर होता. संरक्षण दल हा देशासाठी एक मोठा खर्च आहे. पाकिस्तान आयएमएफचा पाचवा सर्वात मोठा कर्जदार आहे आणि १९५८ पासून त्यांनी २० हून अधिक कर्जे घेतली आहेत. आयएमएफचा ७ अब्ज डॉलर्सचा कर्ज कार्यक्रम सप्टेंबर २०२४ मध्ये मंजूर करण्यात आला.