झोप आणि आत्महत्येचे ‘कनेक्शन’ तरी काय?, सतत टीव्ही-मोबाइल पाहण्यामुळे मुलांवर गंभीर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 07:18 IST2023-08-28T06:00:02+5:302023-08-28T07:18:47+5:30
जगभरातील ६ ते १८ वर्षे वयोगटातील १ लाख २० हजारांहून अधिक मुलांचा यात अभ्यास करण्यात आला.

झोप आणि आत्महत्येचे ‘कनेक्शन’ तरी काय?, सतत टीव्ही-मोबाइल पाहण्यामुळे मुलांवर गंभीर परिणाम
सिॲटल : सध्या अनेक लहान मुले सतत टीव्ही, मोबाइल पाहत असून, त्याचा त्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होत आहे. कोवळ्या वयात अधिक वेळ टीव्ही, मोबाइलवर घालवल्याने त्यांची झोप उडाली असून, मानसिक आरोग्यही बिघडत चालले असल्याचे समोर आले आहे.
अमेरिकेतील सिॲटल शहरात वॉशिंग्टन विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार, अमेरिकेतील तब्बल ४२ टक्के लहान मुलांना मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रासले आहे. त्यांना अतिशय कमी झोप मिळत आहे. जगभरातही अशीच स्थिती आहे. १० ते १२ वर्षे वयोगटातील अनेक मुले मोबाइलवर अधिक वेळ घालवत आहेत. त्यामुळे या मुलांचे मानसिक आरोग्य सुस्थितीत आणण्याचे मोठे आव्हान पालकांसमोर निर्माण झाले आहे.
जगभरातील ६ ते १८ वर्षे वयोगटातील १ लाख २० हजारांहून अधिक मुलांचा यात अभ्यास करण्यात आला. संशोधनानुसार कमी झोप आणि सोशल मीडिया आणि व्हिडीओ गेम्सवर जास्त वेळ घालवल्याने नैराश्य आणि तणाव वाढू लागला आहे.
सिॲटल चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये मी मुलांच्या झोपेच्या आजारांचा अभ्यास होता. आमची टीम टीव्ही,
मोबाइल आणि सोशल मीडियावर घालवलेल्या अतिवेळाच्या नकारात्मक परिणामांचे निरीक्षण करते. याचा परिणाम केवळ झोपेसह शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही होतो, असे संशोधनाचे प्रमुख एम. लिन चेन यांनी म्हटले आहे.
कमी झोप घ्याल तर...
मानसिक आरोग्य आणि झोप हे परस्परांशी जोडले गेले आहे. कमी झोपेमुळे मानसिक आरोग्य बिघडते. याचवेळी मानसिक आरोग्य बिघडल्यास झोप उडते. यावर औषधोपचारानेही फरक पडत नाही. सतत झोपेची कमतरता आत्महत्येच्या विचारांचा धोका वाढवत असल्याचा इशारा अभ्यासात देण्यात आला आहे.
मुले काय करतात?
अभ्यासात असेही दिसून आले आहे, की आठवड्यात फक्त एक तास कमी झोप घेतल्यास उदासीनता वाटणे, आत्महत्येचा गंभीरपणे विचार करणे आणि अमली पदार्थांचा वापर करण्याचे प्रमाण वाढू शकते. जेव्हा मुले झोपत नाहीत, त्यावेळी ती स्मार्टफोनवर जास्त वेळ घालवतात.
टीव्ही, मोबाइल, सोशल मीडियाने लावलेय वेड
सोशल मीडियाचे अनेक फायदे आहेत. मात्र, संशोधनानुसार, सोशल मीडिया वापरण्याचे फायदे कमी आणि तोटे अधिक दिसून येत आहेत. सोशल मीडियावर सक्रिय राहण्यामुळे झोपेचे चक्र बिघडून जात आहे.