आम्हाला विरोध केला तर आणखी १०% टॅरिफ लावू; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 10:25 IST2025-07-08T10:25:06+5:302025-07-08T10:25:49+5:30
२०२४ मध्ये ब्रिक्सचा विस्तार करून इजिप्त, इथियोपिया, इराण आणि संयुक्त अरब आमिरात यांना, तर २०२५ मध्ये इंडोनेशियास सहभागी करून घेण्यात आले.

आम्हाला विरोध केला तर आणखी १०% टॅरिफ लावू; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : ‘ब्रिक्स’ देशांच्या अमेरिकाविरोधी धोरणांना समर्थन देणाऱ्या देशांवर १० टक्के अतिरिक्त शुल्क लावण्याची धमकी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी दिली.
ट्रम्प यांच्या शुल्क वाढीच्या निर्णयावर ब्रिक्स समूहाने ट्रम्प यांचे नाव न घेता टीका केली आहे. त्यामुळे चिडलेल्या ट्रम्प यांनी ही धमकी दिली आहे. ब्रिक्स समूहातील देशांची १७ वी शिखर परिषद ६ व ७ जुलै रोजी ब्राझीलमध्ये होत आहे.
ट्रम्प यांनी समाज माध्यम मंच ‘ट्रुथ सोशल’वर रविवारी जारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘‘ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांशी जोडल्या जाणाऱ्या देशांवर १० टक्के अतिरिक्त शुल्क लावले जाईल. याला कोणीही अपवाद राहणार नाही. याकडे लक्ष दिल्याबद्दल आपले धन्यवाद.” ज्ञात असावे की, ब्रिक्स समूहात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे मूळ ५ देश आहेत. २०२४ मध्ये ब्रिक्सचा विस्तार करून इजिप्त, इथियोपिया, इराण आणि संयुक्त अरब आमिरात यांना, तर २०२५ मध्ये इंडोनेशियास सहभागी करून घेण्यात आले.
आज जाहीर होऊ शकतो भारत-अमेरिका छोटा करार
भारत आणि अमेरिका यांच्यातील छोटा व्यापार करार आज जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी सांगितले की, कराराचा सीमा शुल्क विषयक भाग आज जाहीर होऊ शकतो. इतर भाग नंतर जाहीर केला जाईल.
चीनने दिले स्पष्टीकरण
ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी म्हटले की, ब्रिक्स ही संघटना संघर्षासाठी नाही तसेच ती कोणत्याही अन्य देशास लक्ष्य करीत नाही. उगवत्या बाजारपेठा आणि विकसनशील देशातील समन्वयासाठी ब्रिक्स महत्त्वपूर्ण मंच आहे.