"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 18:35 IST2025-08-13T18:34:02+5:302025-08-13T18:35:47+5:30
खरे तर, पाकिस्तानकडे असलेल्या सर्व एफ-१६ लढाऊ विमानांची संपूर्ण माहिती अमेरिकेकडे आहे. अमेरिकन पथक त्यावर २४ तास लक्ष ठेवून असते. पाकिस्तानकडे सध्या सुमारे ७५ एफ-१६ लढाऊ विमाने आहेत...

"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानची ५ लढाऊ विमाने पाडली, असा खुलासा भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी नुकताच केला. पाकिस्तानकडे अमेरिकेने दिलेली एफ-१६ लढाऊ विमानेही आहेत, ज्यांच्या संपूर्ण देखभाल आणि तांत्रिक मदतीसाठी अमेरिकेची एक टीम पाकिस्तानात राहते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडले गेले का? असा प्रश्न विचारला असता, 'आम्हाला माहिती नाही,' असे अमेरिकेने म्हटले आहे.
F-16 पडल्यासंदर्भात नेमकं काय म्हणालं अमेरिकन परराष्ट्र खातं? -
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, "तुम्ही पाकिस्तान सरकारला विचारा, त्यांची एफ-१६ लढाऊ विमाने पाडली गेली आहेत, की नाही...," असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे. खरे तर, पाकिस्तानकडे असलेल्या सर्व एफ-१६ लढाऊ विमानांची संपूर्ण माहिती अमेरिकेकडे आहे. अमेरिकन पथक त्यावर २४ तास लक्ष ठेवून असते. अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये एक खास करार झाला आहे, त्यानुसार, अमेरिकन पथक तेथे तैनात केले जाते. पाकिस्तानकडे सध्या सुमारे ७५ एफ-१६ लढाऊ विमाने आहेत. २०१९ मध्ये विंग कमांडर अभिनंदन यांनीही, आपल्या मिग-२१ च्या सहाय्याने एक एफ-१६ पाडले होते.
भारताने पाकिस्तानचे 5 फायटर जेट पाडले -
हवाईदलप्रमुख ए.पी. सिंह शनिवारी (9 ऑगस्ट 2025) बंगळुरूमध्ये आयोजित एअरचीफ मार्शल एल. एम. कात्रे व्याख्यानमालेदरम्यान बोलताना म्हणाले होते की, "भारताच्या एस-४०० एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानची ५ लढाऊ विमाने पाडली होती. यात एईडब्ल्यू अँड सी विमानाला तब्बल ३०० किलोमीटर अंतरावरून लक्ष्य करण्यात आले होते."
याशिवाय, "एस ४०० एअर डिफेन्स सिस्टिम अलिकडेच हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. तसेच या संपूर्ण कारवाईदरम्यान, ते गेमचेंजर ठरले. या एअर डिफेन्स सिस्टिममुळे पाकिस्तानी विमानांना भारताच्या हद्दीत प्रवेश करणे आणि लांब पल्ल्याचे ग्लाईड बॉम्ब फेकणे शक्य झाले नाही," असेही हवाईदलप्रमुखांनी यावेळी सांगितले होते.