युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 10:23 IST2025-11-23T10:20:02+5:302025-11-23T10:23:06+5:30
US Venezuela War: गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि व्हेनेझुएलामध्ये संघर्ष सुरू असून, त्याचा आता भडका उडण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेने व्हेनेझुएलाशी संबंधित ऑपरेशनच्या दिशेने पावले टाकली आहेत.

युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
Latest on US Venezuela War: अमेरिका आणि व्हेनेझुएलातील तणाव वाढत चालला आहे. शनिवारी अशा घडामोडी घडल्या की जगात आणखी एका युद्धा भडका उडतोय की काय अशी चर्चा सुरू झाली. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने इशारा दिल्यानंतर सहा हवाई प्रवासी वाहतूक कंपन्यांनी आपल्या विमान सेवा रद्द केल्या आहेत. दुसरीकडे अमेरिकेने युद्धनौका आणि लढाऊ विमानेही अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करण्याची शक्यता वाढली आहे.
अमेरिकेने इशारा दिल्यानंतर स्पेनची इबेरिया, पोर्तुगालची टीएपी, चिलीची लाटम, कोलंबियाची एवियांका, ब्राझीलची जीओएल आणि त्रिनिदाद व टोबॅगोची कॅरेबियन एअरलाईन्स या कंपन्यांनी व्हेनेझुएलातील आपली विमान सेवा बंद केली आहे.
फ्लाईटराडार२४ आणि सिमोन बोलिवर मायकेटिया इंटरनॅशनल एअरपोर्टच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार, ब्राझील, कोलंबिया आणि एअर पोर्तुगाल यांच्या फ्लाईट उड्डाण करण्याच्या तयारीत असतानाच रद्द करण्यात आल्या.
उड्डाण करण्यास धोका असल्याचा इशारा
एरोनॉटिका सिव्हील डे कोलंबियाने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यात म्हटले आहे की, परिस्थिती बिघडली असून, त्या परिसरात लष्करी हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे मॅक्केटिया परिसरातून उड्डाण करण्यास धोका आहे. एअर पोर्तुगालनेही विमाने रद्द केल्याचे स्पष्ट केले आहे.
व्हेनेझुएलाच्या सीमेलगत परिस्थिती बिघडली
अमेरिकेच्या एफएएने जी नोटीस प्रसिद्ध केली आहे, त्यात म्हटले आहे की, व्हेनेझुएला आणि त्याच्या आजूबाजूला सुरक्षा परिस्थिती बिघडत चालली आहे. लष्करी हालचालीही वाढल्या आहेत. विमानांच्या उड्डाणास धोका होऊ शकतो.
गेल्या काही महिन्यात या परिसरात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात केले असून, अमेरिकेने आपले सर्वात मोठे लढाऊ विमान कॅरियर, आठ युद्धनौका, एफ३५ लढाऊ विमाने येथे पाठवली आहेत.
ट्रम्प मादुरोंना हटवणार?
रॉयटर्स वृत्तसंस्थेने आपल्या रिपोर्टमध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासन येणाऱ्या दिवसांमध्ये व्हेनेझुएलाशी संबंधित ऑपरेशनचा पुढचा टप्पा सुरू करणार आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये युद्धाबद्दल जाहीरपणे घोषणा झालेली नाही.
रॉयटर्सने वृत्तात म्हटले आहे की, अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरोंच्या विरोधातील ऑपरेशनमध्ये काही गुप्त मोहिमांचाही समावेश असेल. ज्या पर्यायांवर विचार केला जात आहे, त्यात मादुरो यांना हटवण्याच्या पर्यायावरही विचार केला जात आहे.