अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 06:15 IST2025-10-14T06:14:16+5:302025-10-14T06:15:47+5:30
हमास-इस्रायल शांतता करारानुसार सोमवारी हमासने त्यांच्या ताब्यात असलेल्या सर्व २० इस्रायली ओलिसांची सुटका केली. तर इस्रायलने २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानांची सुटका केली. ज्यूंच्या पवित्र कॅलेंडरमध्ये आज युद्ध संपल्याची नोंद झाल्याचे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू म्हणाले.

अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
डेर अल-बलाह (गाझा पट्टी) : मी अनेक युद्ध थांबविली असा दावा करत शांततेच्या नोबेलची अपेक्षा ठेवणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्यक्ष इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम दिला. विशेष म्हणजे, इस्रायलच्या संसदेत जाऊन त्यांनी या विजयाचे भाषण करत जगाला शांततेचा संदेश दिला. युद्ध प्रत्यक्ष थांबल्याने दोन्ही देशांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. या शांतता कराराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले.
हमास-इस्रायल शांतता करारानुसार सोमवारी हमासने त्यांच्या ताब्यात असलेल्या सर्व २० इस्रायली ओलिसांची सुटका केली. तर इस्रायलने २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानांची सुटका केली. ज्यूंच्या पवित्र कॅलेंडरमध्ये आज युद्ध संपल्याची नोंद झाल्याचे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू म्हणाले.
हमासने सुटका केलेले ओलिस कुटुंबीयांना भेटले. नंतर त्यांना वैद्यकीय तपासणीस पाठवले. इस्रायलच्या ताब्यातले पॅलेस्टिनी बंदिवान रेड क्रॉसच्या अनेक बसमधून आले होते. त्यांच्या स्वागताला गर्दी झाली होती. काही बंदिवानांना इजिप्तच्या सीमेवर सोडण्यात आले.
आता युद्धभूमीवर मिळवण्यासारखे काही राहिलेले नाही. इस्रायलने आता मध्यपूर्व आशियात शांतता प्रस्थापित करण्यावर जोर द्यावा. पॅलेस्टाइनने दहशतवाद व हिंसेचा मार्ग सोडावा. गाझाच्या पुनर्डभारणीसाठी अमेरिका मदत करेल.
- डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
हमास-इस्रायल संघर्षाचा घटनाक्रम
७ ऑक्टोबर २०२३ : रोजी हमासचा
इस्रायलवर हल्ला; हल्ल्यात १२०० नागरिक ठार व २५१ नागरिक ओलिस
८ ऑक्टोबर २०२३ : पासून इस्रायलची गाझा पट्टीवर कारवाई;
सप्टेंबर २०२५: संघर्ष समाप्तीसाठी ट्रम्प शांतता योजनेची चर्चा
११ ऑक्टोबर २०२५ : इस्रायल-हमास शांतता प्रस्तावावर सहमत
१२ ऑक्टोबर २०२५ : शांतता प्रस्तावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी
०२ वर्ष संघर्ष
६७ हजार पॅलेस्टिनी ठार
२० लाख पॅलेस्टिनी विस्थापित
९०% गाझा पट्टीतील घरे उद्ध्वस्त