रशियात व्लादिमीर पुतिन-किम जोंग उन यांची भेट: स्पेसपोर्टमध्ये झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:42 PM2023-09-13T12:42:39+5:302023-09-13T12:44:38+5:30

किम जोंग यांनी रशियन स्पेस रॉकेट लॉन्च साइट वोस्टोचनी कॉस्मोड्रोम येथे प्रक्षेपण सुविधेचा आढावा घेतला. 

Vladimir Putin-Kim Jong Un meet in Russia: Talks held at Spaceport | रशियात व्लादिमीर पुतिन-किम जोंग उन यांची भेट: स्पेसपोर्टमध्ये झाली चर्चा

रशियात व्लादिमीर पुतिन-किम जोंग उन यांची भेट: स्पेसपोर्टमध्ये झाली चर्चा

googlenewsNext

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग यांची आज रशियन स्पेसपोर्ट वोस्टोचनी कॉस्मोड्रोम येथे भेट झाली. किम जोंग यांनी रशियन स्पेस रॉकेट लॉन्च साइट वोस्टोचनी कॉस्मोड्रोम येथे प्रक्षेपण सुविधेचा आढावा घेतला. 

किम जोंग मंगळवारी ट्रेनने रशियाचे शहर व्लादिवोस्तोक येथे पोहोचले. हे ठिकाण रशिया आणि उत्तर कोरियाच्या सीमेपासून सुमारे 127 मैल दूर आहे. लष्कराचे वरिष्ठ कमांडरही त्यांच्यासोबत आहेत. रशियासोबत चांगले संबंध हे आमचे प्राधान्य आहे. साम्राज्यवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही रशियासोबत होतो आणि नेहमीच राहू, असं किम जोंग उन यांनी सांगितले.

अंतराळ क्षेत्रात उत्तर कोरियासोबतच्या सहकार्याच्या प्रश्नावर पुतिन म्हणाले, 'आम्ही याच कारणासाठी स्पेस सेंटरमध्ये भेटत आहोत. उत्तर कोरियाच्या नेत्यांना रॉकेट बांधकाम तंत्रज्ञानामध्ये रस आहे. आमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करू, किम जोंग उन यांना भेटून आनंद झाला, असं पुतिन यांनी सांगितले. 

शस्त्र-तंत्रज्ञानाचा करार

युक्रेन युद्धामुळे रशियावर अनेक देशांनी निर्बंध लादले आहेत. यामुळेच रशिया आता शस्त्रास्त्रांसाठी उत्तर कोरियाशी हातमिळवणी करत आहे. उत्तर कोरियाने गेल्या वर्षीच रशियाला रॉकेट आणि क्षेपणास्त्रे दिली होती. शस्त्रांस्त्र बदल्यात उत्तर कोरिया रशियाकडून तंत्रज्ञान मागू शकतो, असा दावा जॉन किर्बी यांनी केला आहे. असे झाल्यास त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात. उत्तर कोरियावरही अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र रशियाकडून तंत्रज्ञान मिळाल्यास त्यांचा शस्त्रसाठा वाढवू शकतो.

दोघांमधील वाढती लष्करी मैत्री

उत्तर कोरिया आणि रशिया यांच्यातील लष्करी मैत्री लक्षणीयरित्या वाढत आहे. अमेरिकेचा दावा आहे की, सप्टेंबर 2022 मध्ये उत्तर कोरियाने मोठ्या प्रमाणात तोफा आणि दारुगोळा रशियाला दिला होता. जानेवारी 2023 मध्येही उत्तर कोरियाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची खाजगी सेना म्हणवल्या जाणाऱ्या वॅगनर ग्रुपला रॉकेट आणि क्षेपणास्त्रे पुरवली होती. एवढेच नाही तर अमेरिकेने उत्तर कोरिया आणि रशियाच्या सीमेचा एक सॅटेलाइट फोटोही शेअर केला होता, ज्यामध्ये एक ट्रेन प्राणघातक शस्त्रे घेऊन जाताना दिसत होती.

Web Title: Vladimir Putin-Kim Jong Un meet in Russia: Talks held at Spaceport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.