Violence in Pakistan violent clash between police and tlp workers over french ambassador in lahore pakistan | Violence in Pakistan : पाकिस्तानमध्ये मोठा हिंसाचार! पोलीस आणि कट्टरतावाद्यांमध्ये संघर्ष; 800 भारतीय शीख अडकले

Violence in Pakistan : पाकिस्तानमध्ये मोठा हिंसाचार! पोलीस आणि कट्टरतावाद्यांमध्ये संघर्ष; 800 भारतीय शीख अडकले

इस्लामाबाद - पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये मंगळवारी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळून आला. या दरम्यान पोलीस आणि कट्टरतावादी पक्ष असलेल्या तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानच्या (टीएलपी) कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून फ्रान्सच्या राजदूताला पाकिस्तानमधून परत पाठवावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. यामध्ये अनेक कार्यकर्ते ठार झाले आहेत. तसेच या हिंसाचारामुळे पाकिस्तानमध्ये गेलेले 800 भारतीय शीख अडकले आहेत.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, टीएलपीने पोलिसांसोबत झालेल्या संघर्षात 12 कार्यकर्ते ठार झाल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानमधील लाहोरसह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दलाचे जवान तैनात केले आहेत. पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये टीएलपीच्या कार्यकर्त्यांनी रस्ते अडवून ठेवले आहेत. यामुळे 800 भारतीय शीख अडकून राहिले आहेत. सोमवारी (12 एप्रिल) बैसाखी सण साजरा करण्यासाठी 815 शीखांचा गट वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानमध्ये दाखल झाला होता. 

हिंसाचार सुरू झाल्याने मार्ग बंद, शीख भाविक अडकले

पाकिस्तानमधील पंजा साहिब गुरुद्वाराच्या दर्शनासाठी हे भारतीय शीख पाकिस्तानमध्ये दाखल झाले होते. मात्र, अद्यापही ते गुरुद्वारामध्ये पोहचले नसल्याची माहिती आहे. पाकिस्तान सरकारच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 25 बसमधून या भारतीय शीखांना गुरुद्वारा साहिब येथे नेण्यात येत होते. मात्र, हिंसाचार सुरू झाल्याने हा मार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे शीख भाविक अडकले असल्याची माहिती मिळत आहे. 

टीएलपी पक्ष हा कट्टरतावादी इस्लामिक पक्ष असल्याचे म्हटले जाते. फ्रान्सच्या राजदूतांची पाकिस्तानमधून हकालपट्टी करणे आणि फ्रान्ससोबत सारे संबंध तोडून टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी 20 एप्रिलपर्यंतची मुदत पाकिस्तान सरकारला दिली आहे. पाकिस्तान सरकारने ही कारवाई न केल्यास देशभरात आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी पोलिसांनी टीएलपीचा प्रमुख अलामा साद हुसैन रिझवीला अटक केली. त्यानंतर हा हिंसाचार उफाळून आला आहे. यामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Violence in Pakistan violent clash between police and tlp workers over french ambassador in lahore pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.