Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 13:14 IST2025-08-22T13:14:03+5:302025-08-22T13:14:15+5:30
ओमानच्या आखातात आणि हिंदी महासागरात समुद्रातील लक्ष्यांवर ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
इस्त्रायलसोबत १२ दिवसांच्या युद्धानंतरइराणच्या नौदलाने प्रथमच लष्करी सराव केला आहे. स्टेट टीव्ही प्रेसच्या रिपोर्टनुसार, या लष्करी सरावाला 'सस्टेनेबल पॉवर १४०४' असं नाव देण्यात आलं आहे. या सरावादरम्यान, इराणच्या नौदलाने केवळ १ मिनिटात ११ क्षेपणास्त्रे डागली.
ओमानच्या आखातात आणि हिंदी महासागरात समुद्रातील लक्ष्यांवर ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली. १२ दिवसांच्या युद्धात इस्त्रायलने इराणची हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त केली होती, तसेच अनेक अणु ठिकाणांनाही लक्ष्य केले होते. अशा परिस्थितीत, हा लष्करी सराव इराणसाठी आपली लष्करी ताकद दाखवण्याची आणि शत्रूंना इशारा देण्याचा प्रयत्न मानला जात आहे.
नौदलाची मारक क्षमता
इराणच्या राज्य टीव्हीने सांगितलं की, इराणी नौदलाची युद्धनौका आयआरआयएस सबलान आणि आयआरआयएस गनावेहने नासिर आणि कादिर क्रूझ क्षेपणास्त्रे डागली, जी त्यांच्या लक्ष्यांवर यशस्वीरित्या आदळली. याव्यतिरिक्त, किनारपट्टीवरील बॅटरीतूनही क्षेपणास्त्रे सोडण्यात आली आणि ड्रोनद्वारे समुद्रातील लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला. नौदलाचा हा सराव ओमानचा आखात आणि उत्तर हिंदी महासागरात करण्यात आला.
Iran's Navy begins a major two-day naval missile exercise, codenamed Sustainable Power 1404, across the Gulf of Oman and the northern Indian Ocean.
— Press TV 🔻 (@PressTV) August 21, 2025
Follow Press TV on Telegram: https://t.co/LWoNSpkc2Jpic.twitter.com/Ez1OFTPC64
रशियासोबतच्या सरावानंतर इराणचा संदेश
गेल्या महिन्यातच इराण आणि रशियाने 'कसारेक्स २०२५' नावाचा संयुक्त सराव केला होता. आता इराणने दक्षिणेकडील समुद्रात एकट्याने आपली ताकद दाखवली आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हा सराव केवळ ताकद दाखवण्यासाठी नसून, इस्त्रायलला एक संदेश आहे की इराण अजूनही पलटवार करण्याच्या स्थितीत आहे.
अणुकराराबाबत थंड भूमिका
इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर, तेहरानने वॉशिंग्टनसोबत सुरू असलेली अणु-चर्चा स्थगित केली आहे. मात्र, इराणने संयुक्त राष्ट्र अणु निरीक्षण संस्थेशी पूर्णपणे संबंध तोडणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. ए.पी.च्या रिपोर्टनुसार, इराणचे संरक्षण मंत्री ब्रिगेडियर जनरल अजीज नसीरजादेह यांनी सांगितलं की, देशाने आपल्या सैन्याला नवीन क्षेपणास्त्रांनी सुसज्ज केलं आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, शत्रूच्या कोणत्याही नवीन साहसाला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल.