Delcy Rodriguez : "फक्त १५ मिनिटं, अन्यथा त्यांनी आम्हाला..."; व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 08:30 IST2026-01-25T08:28:46+5:302026-01-25T08:30:42+5:30
Delcy Rodriguez : व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांनी खळबळजनक दावा केला आहे.

Delcy Rodriguez : "फक्त १५ मिनिटं, अन्यथा त्यांनी आम्हाला..."; व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचा खळबळजनक दावा
व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांनी खळबळजनक दावा केला आहे. जेव्हा देशाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकन सैनिकांनी पकडलं, तेव्हा त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. "त्यांनी आम्हाला उत्तर देण्यासाठी फक्त १५ मिनिटांचा वेळ दिला होता, अन्यथा त्यांनी आम्हाला मारून टाकलं असतं.." असं म्हटलं आहे.
अमेरिकेने त्यांच्या कॅबिनेटला १५ मिनिटांची वेळ देत स्पष्ट केलं होतं की, त्यांनी अमेरिकेच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा सर्वांना गोळ्या घातल्या जातील. 'द गार्डियन'च्या रिपोर्टनुसार, एका लीक झालेल्या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, डेल्सी रॉड्रिगेज यांनी अमेरिकन ऑपरेशनच्या सात दिवसांनंतर आपल्या एका सहकाऱ्याशी संवाद साधला होता. त्या लष्करी कारवाईत निकोलस मादुरो यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि नंतर त्यांना अमेरिकेत नेण्यात आलं.
मादुरो दीर्घकाळापासून होते निशाण्यावर
निकोलस मादुरो हे बऱ्याच काळापासून वॉशिंग्टनच्या निशाण्यावर होते. या लष्करी कारवाईनंतर मादुरो यांना अमेरिकेत नेण्यात आलं असून, आता त्यांच्यावर तिथे खटला चालवला जात आहे. रॉड्रिगेज यांनी दावा केला की, अमेरिकेच्या धमकीपुढे झुकून आपल्या सहकाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना अत्यंत कठीण निर्णय घ्यावे लागले आणि अमेरिकेच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या.
"परिणामांसाठी तयार राहा"
लीक झालेल्या व्हिडिओमध्ये रॉड्रिगेज सांगत आहेत की, अमेरिकन सैनिकांनी त्यांना मादुरो आणि त्यांच्या पत्नीची हत्या झाल्याचं खोटं सांगितलं होतं. तसेच आता त्यांनी आणि त्यांच्या भावाने अशाच परिणामांसाठी तयार राहावं, असा इशारा दिला होता.
"फक्त १५ मिनिटं दिली होती"
त्या म्हणाल्या की, अशा परिस्थितीत देशाची जबाबदारी स्वीकारणं अत्यंत वेदनादायक होतं. राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या अपहरणाच्या पहिल्या मिनिटापासूनच धमक्या मिळण्यास सुरुवात झाली होती. कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांना निर्णय घेण्यासाठी फक्त १५ मिनिटं दिली होती, अन्यथा त्यांनी आम्हाला मारून टाकलं असतं.
हे खुलासे अशा वेळी समोर आले आहेत जेव्हा एक दिवस आधीच कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज आणि ट्रम्प प्रशासन यांच्यात गुप्त युती असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रॉड्रिगेज नोव्हेंबर २०२५ पासूनच अमेरिकेच्या संपर्कात होत्या आणि मादुरो यांच्या अटकेनंतर सत्ता सांभाळण्याचे संकेत देत होत्या. यावरून असे सूचित होतं की, मादुरो यांना सत्तेवरून हटवणं आवश्यक मानलं जात होतं.