इराण युद्ध सुरू असतानाच अमेरिकेला झटका! KC-135 रिफ्युलिंग विमान इराकमध्ये कोसळले, ५ ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 08:07 IST2026-03-13T08:05:39+5:302026-03-13T08:07:41+5:30
U.S. KC-135: इराणसोबत युद्ध सुरु असतानाच अमेरिकेला झटका बसला. अमेरिकेचे लढाऊ विमानांमध्ये इंधन भरणारे U.S. KC-135 हे विमान इराकमध्ये कोसळले.

इराण युद्ध सुरू असतानाच अमेरिकेला झटका! KC-135 रिफ्युलिंग विमान इराकमध्ये कोसळले, ५ ठार
अमेरिकेच्या लष्कराचे एक रिफ्युलिंग विमानाचा मोठा अपघात झाला आहे. विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने या घटनेबद्दल माहिती देताना म्हटले आहे की, इराणमध्येयुद्ध सुरू असताना आमचे KC-135 रिफ्युलिंग विमान कोसळले आहे. या विमानात पाच क्रू मेंबर्स होते.
अमेरिकन लष्कराने म्हटले आहे की, दोन रिफ्युलिंग विमाने होते. त्यापैकी एक विमान सुरक्षितपणे उतरले, तर दुसरे विमान कोसळले. ही घटना ना शत्रूने केलेल्या हल्ल्यामुळे घडली आहे, ना चुकून झालेल्या गोळीबारात. सध्या बचाव कार्य सुरू आहे आणि याचा तपास केला जात आहे.
अमेरिकेच्या लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑपरेशन एपिक फ्युरीच्या दरम्यान मित्र राष्ट्राच्या हद्दीत ही घटना घडली आहे. एपिक फ्युरी ऑपरेशन अमेरिकेने इराण विरोधात सुरू केले आहे.
KC-135 विमान काय?
अमेरिकेचे U.S. KC-135 हे विमान लांब पल्ल्यांच्या मोहिमांवर असलेल्या लढाऊ विमाने आणि इतर विमानांमध्ये आकाशातच इंधन भरण्यासाठी वापरले जाते. इराणविरोधात अमेरिकेने युद्ध छेडले असून, अमेरिकेच्या लढाऊ विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी हे विमान इराकमध्ये होते.
कोसळलेले विमान ६० वर्षांपासून सेवेत होते. या विमानात पाच जण होते. एक पायलट आणि एक को पायलट होता. इतर विमानात इंधन भरण्याची जबाबदारी असलेले कर्मचारीही होते.
इराण युद्धात अमेरिकेने चौथे विमान गमावले
इराणसोबतचे युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने चार विमाने गमावली आहे. यात तीन लढाऊ विमानांचा समावेश आहे. अमेरिकेची तीन लढाऊ विमाने कुवैतमध्येच पडली. तर एक रिफ्युलिंग विमान इराकमध्ये कोसळले.
एफ-१५ ही ती लढाऊ विमाने कुवैतकडूनच चुकीने झालेल्या हल्ल्यांमध्ये पाडली गेली. या तिन्ही लढाऊ विमानांचे पायलट मात्र सुरक्षित वाचले.