अमेरिकन पाणबुडीचा श्रीलंकेजवळ इराणी युद्धनौकेवर हल्ला; ८७ ठार, दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच असा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 05:14 IST2026-03-05T05:14:25+5:302026-03-05T05:14:43+5:30
अमेरिका म्हणते, इराणला वाटत होते आंतरराष्ट्रीय समुद्रात ते मोकळेपणाने वावरू शकतात..; भारतासाठी महत्त्वाचे... भारतात नुकताच सराव करून परतणाऱ्या युद्धनौकेला केले गेले टार्गेट

अमेरिकन पाणबुडीचा श्रीलंकेजवळ इराणी युद्धनौकेवर हल्ला; ८७ ठार, दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच असा हल्ला
कोलंबो : अमेरिका-इराणयुद्ध आता भारताच्या अगदी जवळ येऊन पोहोचले असून, श्रीलंकेतील गाले शहराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ अमेरिकी पाणबुडीने टार्पेडोद्वारे इराणच्यायुद्धनौकेवर हल्ला केला. ही युद्धनौका भारतातून इराणमध्ये परतत होती. त्यावर असलेल्या इराणच्या नौदलाच्या १८० नौसैनिकांपैकी ८७ जण ठार झाले असून, ३२ नौसैनिकांना वाचविण्यात यश आले. इतर बेपत्ता नौसैनिकांचा श्रीलंका नौदलाकडून शोध घेण्यात येत आहे.
ही युद्धनौका भारतात विशाखापट्टणम येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी झाली होती. परत जाताना दक्षिण श्रीलंकेतील गाले शहरापासून सुमारे ४० नॉटिकल मैल (सुमारे ७५ किलोमीटर) अंतरावर असताना हा हल्ला झाला. टार्पेडोने हल्ला करून युद्धनौका बुडविल्याची दुसऱ्या महायुद्धानंतरची ही पहिलीच घटना आहे.
श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री विजिथा हेराथ यांनी संसदेत सांगितले की, बुधवारी सकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी आयआरआयएस डेना नावाची युद्धनौका बुडत असल्याची माहिती श्रीलंका नौदल आणि कोस्ट गार्डला मिळाली. त्यानंतर तातडीने बचावकार्यास सुरुवात झाली.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री पिट हेगसेथ यांनी सांगितले, अमेरिकेच्या पाणबुडीने इराणी युद्धनौकेवर हल्ला करून ती बुडवली. श्रीलंका नौदलाचे प्रवक्ते कमांडर बुद्धिका सम्पथ म्हणाले
की, इराणच्या नौदलाच्या युद्धनौकेभोवती तेलाचा मोठा तवंग आढळून आला. (वृत्तसंस्था)
होर्मुझ सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजांची वाहतूक ९०% घटली
लंडन : इराणवरील हल्ल्यांनंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांची वाहतूक सुमारे ९० टक्क्यांनी घटल्याचे ऊर्जा बाजार विश्लेषक संस्था क्प्लेरने सांगितले. जगातील सुमारे २० टक्के कच्चे तेलाची या मार्गाने वाहतूक होते.
इराणी अधिकाऱ्यांनी या महत्त्वाच्या जलमार्गावरील वाहतूक पूर्णपणे रोखल्याचा दावा केला असला तरी काही जहाजे एआयएस ट्रॅकिंग प्रणाली बंद ठेवून धोकादायक मार्गाने प्रवास करत असल्याचे क्प्लेरचे विश्लेषक मॅट राईट यांनी नमूद केले.
युद्धाचे परिणाम जाणून घ्या एका वाक्यात...
गुजरातमधील मोरबी येथील प्रसिद्ध सिरेमिक (माती आणि टाइल्स) उद्योग पुढील काही दिवसांत पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे बुधवारी रुपया ६७ पैशांनी घसरून ९२.१६ या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला.
होर्मुझ सामुद्रधुनीत भारताची ३८ जहाजे अडकून पडली. त्यामुळे भारताची १० हजार कोटींची मालमत्ता धोक्यात.