Donald Trump : "आमच्या कंपन्यांना बाहेर काढलं..."; व्हेनेझुएला एअर स्ट्राईकनंतर ट्रम्प यांचा जुना Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 17:41 IST2026-01-03T17:40:08+5:302026-01-03T17:41:01+5:30
Donald Trump : अमेरिकेने व्हेनेझुएलाची राजधानी काराकाससह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर भीषण एअर स्ट्राईक केला आहे.

Donald Trump : "आमच्या कंपन्यांना बाहेर काढलं..."; व्हेनेझुएला एअर स्ट्राईकनंतर ट्रम्प यांचा जुना Video व्हायरल
अमेरिकेने व्हेनेझुएलाची राजधानी काराकाससह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर भीषण एअर स्ट्राईक केला आहे. अमेरिकन हवाई दलाने काराकाससह मिरांडा, अरगुआ आणि ला गुइरा या शहरांवर जोरदार बॉम्ब हल्ले केले. या हल्ल्यानंतर व्हेनेझुएलामध्ये 'राष्ट्रीय आणीबाणी' घोषित करण्यात आली आहे. दरम्यान, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकेने आपल्या ताब्यात घेतलं असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
अमेरिकेच्या या लष्करी कारवाईदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ट्रम्प म्हणतात की, "त्यांनी आमचे तेलाचे अधिकार हिरावून घेतले. तिथे आमचा मोठा तेल साठा होता. त्यांनी आमच्या कंपन्यांना तिथून बाहेर काढलं आणि आम्हाला त्या परत हव्या आहेत." हा व्हिडीओ गेल्या वर्षी १८ डिसेंबरचा आहे, जेव्हा ट्रम्प यांनी 'एअरफोर्स वन'मधून उड्डाण करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता.
🇺🇸🇻🇪Trump speaking about #Venezuela on December 18th, 2025:
— Commentary: Trump Truth Social Posts On X (@TrumpTruthOnX) January 3, 2026
“They took our oil rights. We had a lot of oil there. They threw our companies out. And we want it back.” pic.twitter.com/t0ybh3Os04
ट्रम्प वारंवार व्हेनेझुएलावर अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप लावून त्यांच्या जहाजांवर हल्ले करत असले, तरी त्यांचं मुख्य लक्ष व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यावरच असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेने अनेकदा व्हेनेझुएलाची मालवाहू जहाजे क्षेपणास्त्राने उडवून दिली आहेत. या लष्करी कारवाईचा बचाव करताना ट्रम्प म्हणाले होते की, व्हेनेझुएला अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी करत आहे, जी आमच्या जवानांनी रोखली आहे. यावरून त्यांनी निकोलस मादुरो यांना 'ड्रग्ज तस्कर' देखील संबोधलं होतं.
व्हेनेझुएलाने महिनाभरापूर्वी दिली होती ऑफर
व्हेनेझुएलाने २ डिसेंबर रोजी असं म्हटले होतं की, ते अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अमेरिकेसोबत करार करण्यास तयार आहेत. मात्र, निकोलस मादुरो यांना याची पूर्ण कल्पना होती की, ट्रम्प यांना त्यांचं सरकार पाडायचेंआहे, कारण मादुरो यांनी अमेरिकन तेल कंपन्यांना व्हेनेझुएलातून बाहेर काढलं होतं.
व्हेनेझुएलाला अमेरिकेने चहुबाजूंनी घेरलं
ट्रम्प काहीतरी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत, याचा अंदाज आधीच आला होता कारण अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाला चहुबाजूंनी घेरलं होतं. ट्रम्प वारंवार व्हेनेझुएलामध्ये ग्राउंड ऑपरेशन करण्याची धमकीही देत होते. अखेर ३ जानेवारी रोजी पहाटे अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठा हवाई हल्ला केला.