इलॉन मस्क यांची गाडी रुळावरून घसरलीय; हे पाऊल हास्यास्पद, डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 10:32 IST2025-07-08T10:31:45+5:302025-07-08T10:32:07+5:30
पाऊल हास्यास्पद; तिसरा पक्ष अव्यवस्था व अराजकता निर्माण करत असल्याचा केला दावा

इलॉन मस्क यांची गाडी रुळावरून घसरलीय; हे पाऊल हास्यास्पद, डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली खिल्ली
न्यूयॉर्क - टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांच्या नवीन राजकीय पक्ष काढण्याच्या निर्णयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली असून, मस्क यांचे पाऊल हास्यास्पद आहे व त्यांची गाडी रूळावरून घसरली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्षांना आव्हान देण्यासाठी मस्क यांनी अमेरिकन पार्टी काढली आहे. त्याबाबत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी यांनी म्हटले आहे की, मला वाटते तिसरा पक्ष काढणे हास्यास्पद आहे. देशात नेहमीच द्विपक्षीय प्रणाली राहिलेली आहे. तिसरा पक्ष काढणे केवळ भ्रम निर्माण करणारे आहे.
सोशल मीडियावर त्यांनी लिहिले आहे की, मस्क यांची गाडी पूर्णपणे रूळावरून घसरली आहे, हे पाहून दु:ख होते. तिसऱ्या पक्षाचे एकच काम असते - देशात पूर्णपणे अव्यवस्था व अराजकता निर्माण करणे. अमेरिकेत इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देणारी सबसिडी समाप्त करण्याच्या ट्रम्प यांच्या
योजनेवर नाराज होऊन मस्क यांनी नवीन राजकीय पक्ष काढला आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मस्क यांचे मित्र जारेड आयजॅकमॅन यांना नासाचे प्रशासक नियुक्त करावे, यासाठी ते आग्रही होते. मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातील सरकारी पद सोडले तेव्हा आयजॅकमॅन यांनीही त्यांचे नामांकन मागे घेतले होते.
मस्क निवडणूक लढवू शकणार नाहीत पण...
अमेरिकेच्या संविधानानुसार, अमेरिकेत जन्मलेली व्यक्तीच निवडणूक लढवू शकते. मस्क यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला. अशा परिस्थितीत ते अमेरिकेत निवडणूक लढवू शकत नाहीत. मस्क त्यांचे उमेदवार उभे करतील. नोव्हेंबर २०२६ मध्ये, प्रतिनिधी सभागृहाच्या सर्व ४३५ जागांसाठी आणि सिनेटच्या १०० पैकी ३४ जागांसाठी निवडणुका होतील. मस्कची योजना आहे की ट्रम्पच्या विधेयकांना रोखून ते किंगमेकरच्या भूमिकेत येऊ शकतील.
मस्क यांच्या पक्षाबाबत जगभरात उत्सुकता वाढली
ट्रम्प यांच्या सर्वांत महत्त्वपूर्ण विधेयकावर मस्क यांनी टीका केली आणि ट्रम्प यांच्याशी त्यांचे बिनसले. अमेरिकेतील द्विपक्षीय प्रणालीवर मागील अनेक वर्षांपासून टीका करण्यात येत होती. परंतु तिसरा पक्ष स्थापन करण्याच्या प्रयत्नांना फारसे यश मिळालेले नाही. मस्क यांच्या पक्षाने जगभरात उत्सुकता वाढवली आहे.