"अमेरिका शांततेच्या नाही, तर मोठ्या युद्धाच्या तयारीत!", इराणी नेते गालिबाफ यांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 17:13 IST2026-03-29T17:13:20+5:302026-03-29T17:13:57+5:30
इराणचे संसद अध्यक्ष गालिबाफ यांनी अमेरिकेवर गुप्त युद्धाचा आरोप केला आहे. इराणने बहरीन आणि युएईमधील अमेरिकेशी संबंधित कंपन्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.

"अमेरिका शांततेच्या नाही, तर मोठ्या युद्धाच्या तयारीत!", इराणी नेते गालिबाफ यांचा खळबळजनक दावा
मध्यपूर्वेतील तणाव आता एका निर्णायक आणि अधिक धोकादायक वळणावर पोहोचला आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगेर गालिबाफ यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. "अमेरिका जगासमोर शांतता आणि चर्चेच्या गप्पा मारत असली, तरी प्रत्यक्षात मात्र ते इराणवर मोठ्या जमिनी हल्ल्याची तयारी गुपचूपपणे करत आहेत," असा दावा गालिबाफ यांनी केला आहे.
"आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ!"
गालिबाफ यांनी सरकारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, इराणची सेना कोणत्याही प्रकारच्या अमेरिकन हल्ल्याचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. "आमचे सैन्य केवळ आदेशाची वाट पाहत आहे. जर अमेरिकेने धाडस केले, तर आम्ही केवळ त्यांनाच नाही, तर या भागातील त्यांच्या मित्रराष्ट्रांनाही कठोर शिक्षा देऊ," असा इशारा त्यांनी दिला. यामुळे खाडी देशांमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बहरीन आणि युएईमधील कंपन्यांना इराणचा तडाखा
दुसरीकडे, इराणने खाडीतील महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. बहरीनमधील 'ॲल्युमिनियम बहरीन' आणि संयुक्त अरब अमिरातीमधील 'एमिरेट्स ग्लोबल ॲल्युमिनियम' या कंपन्यांवर इराणने क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे भीषण हल्ले केले आहेत. या हल्ल्यात अल्बाचे दोन कर्मचारी जखमी झाले असून दोन्ही कंपन्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड्स'ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
हल्ल्यामागचे कारण काय?
इराणच्या मते, या कंपन्यांचे अमेरिकन लष्कर आणि एरोस्पेस क्षेत्राशी जवळचे संबंध आहेत. इराणमधील औद्योगिक स्थळांवर जे हल्ले झाले, त्यांचा बदला घेण्यासाठीच या कंपन्यांना लक्ष्य केल्याचे इराणने म्हटले आहे. त्यातच होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जागतिक व्यापारावरही मोठे संकट आले आहे.