ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 08:38 IST2025-07-01T08:37:49+5:302025-07-01T08:38:26+5:30

अमेरिकन सीनेटरकडून होणाऱ्या या विधानांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. 

US on India: Lindsey Graham's proposal is to impose 500% tariffs on any country that buys Russian energy. India, along with China | ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."

वॉश्गिंटन - अमेरिकेतील सीनेटर लिंडसे ग्राहम यांनी पुन्हा एकदा भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. भारत आणि चीन असे देश आहेत जे वारंवार रशियाची मदत करत आहेत. जर या देशांनी ही मदत करणे बंद केले नाही तर त्यांच्यावर ५०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावला जाईल असं डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे नेते लिंडसे ग्राहम यांनी म्हटलं आहे. ग्राहम यांनी भारताविरोधात अशाप्रकारच्या आक्रमक भाषेचा वापर पहिल्यांदाच केला असं नाही. अलीकडच्या काळात ते सातत्याने टॅरिफच्या नावाखाली भारताला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु भारतानेही ग्राहम यांच्याकडे दुर्लक्ष करत मित्र रशियाला सहकार्य करण्याची भूमिका कायम ठेवली आहे.

सीनेटर लिंडसे ग्राहम यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, रशियाचे समर्थन करण्यासाठी भारत आणि चीनला अमेरिकेकडून लवकरच ५०० टक्के टॅरिफचा सामना करावा लागू शकतो. भारत आणि चीन आजही रशियाकडून ७० टक्के तेल खरेदी करतात. या देशांच्या व्यवहारामुळे ते व्लादीमीर पुतिन यांच्या युक्रेन युद्धात रशियाला मदत करत असल्याचे दिसून येते असं त्यांनी सांगितले. अमेरिकन सीनेटरकडून होणाऱ्या या विधानांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. 

तसेच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही चीन आणि भारतावर निर्बंध आणणारे विधेयक तयार करण्यास सांगितले आहे. आता हे विधेयक पुढे नेण्याची वेळ आली आहे. या निर्बंध विधेयकात रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर ५०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याची तरतूद आहे. या विधेयकात प्रामुख्याने भारत आणि चीनसारख्या देशांना टार्गेट केले जाणार आहे असंही ग्राहम यांनी दावा केला आहे.

दरम्यान, हे निर्बंध आणणारं विधेयक जुलै महिन्यात येऊ शकते. या विधेयकात अशा देशांवर ५०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याची तरतूद केली आहे जे सातत्याने रशियाची मदत करत आहेत. रशिया-युक्रेन युद्धात एकप्रकारे ही पुतिन यांना केलेली मदत आहे. याचा थेट अर्थ जर भारत आणि चीन यांनी रशियाकडून तेल खरेदी आणि इतर व्यापार सुरू ठेवला तर अमेरिकेकडून या दोन्ही देशांना टॅरिफचा सामना करावा लागू शकतो. 

रशियाला कमकुवत करण्याचा डाव

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यानंतर अमेरिकेकडून सातत्याने रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. युरोपीय देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लावले आहेत. त्यातच अमेरिका रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु चीन, भारत, इराणसारख्या देशांनी अमेरिकेच्या धमक्यांना दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सातत्याने अमेरिकेतील नेते या देशांवर आपला राग व्यक्त करत असतात. 

Web Title: US on India: Lindsey Graham's proposal is to impose 500% tariffs on any country that buys Russian energy. India, along with China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.