"भारताशी संबंध तात्काळ सुधारा, नाहीतर..."; अमेरिकन खासदारांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:52 IST2025-10-09T18:45:21+5:302025-10-09T18:52:38+5:30
अमेरिकेच्या काँग्रेस सदस्यांच्या एका गटाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची विनंती केली.

"भारताशी संबंध तात्काळ सुधारा, नाहीतर..."; अमेरिकन खासदारांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा
Donald Trump: टॅरिफ आणि अन्य व्यापारविषयक मुद्द्यांवरून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेल्याने आता अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणातही खळबळ माजली आहे. अमेरिकेत १९ खासदारांनी थेट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून भारतासोबतचे बिघडलेले संबंध तातडीने सुधारण्याची मागणी केली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या '५० टक्के टॅरिफ' धोरणामुळे दोन्ही देशांवर नकारात्मक परिणाम होत असल्याचा स्पष्ट इशारा या खासदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिला आहे.
८ ऑक्टोबर २०२५ रोजी अमेरिकन काँग्रेसच्या १९ सदस्यांच्या गटाने हे पत्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लिहिले. डेबोरा रॉस आणि रो खन्ना यांच्या नेतृत्वाखालील या खासदारांनी ट्रम्प प्रशासनाला ५० टक्के टॅरिफचा निर्णय त्वरित मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच या खासदारांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भारतासोबतचे अमेरिकेचे ताणलेले संबंध लवकरात लवकर सुधारावेत घ्यावे अशी विनंती केली आहे. या खासदारांमध्ये राजा कृष्णमूर्ती आणि प्रमिला जयपाल यांचाही समावेश आहे.
पत्रानुसार, ऑगस्ट २०२५ च्या अखेरीस ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंवरचा टॅरिफ ५० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यात भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल २५ टक्के दंड देखील समाविष्ट आहे. या निर्यणामुळे केवळ भारतीय उत्पादकांनाच नाही, तर अमेरिकेतील ग्राहकांना देखील मोठा फटका बसत आहे. यामुळे पुरवठा साखळीवर नकारात्मक परिणाम होत असून, अनेक अमेरिकी कंपन्यांना उत्पादन बाजारात आणणे कठीण झाले आहे, असं पत्रात म्हटलं आहे.
अमेरिकन खासदारांनी पत्रात भारताचे व्यापारी भागीदार म्हणून असलेले महत्त्व अधोरेखित केले. सेमीकंडक्टरपासून ते आरोग्य सेवा आणि ऊर्जेपर्यंतच्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी अमेरिकेचा उत्पादन व्यवसाय भारतावर अवलंबून आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, भारतात गुंतवणूक करणाऱ्या अमेरिकी कंपन्यांना जगात वेगाने वाढणाऱ्या ग्राहक बाजारात प्रवेश मिळतो, तर भारतातून होणाऱ्या गुंतवणुकीमुळे अमेरिकेत रोजगारनिर्मिती होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
टॅरिफचा वाढता तणाव कायम राहिल्यास दोन्ही देशांच्या संबंधात धोका निर्माण होऊ शकतो. याचा थेट परिणाम अमेरिकी नागरिकांच्या खिशावर होईल, तसेच जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची अमेरिकन कंपन्यांची क्षमता कमकुवत होईल, असा इशाराही खासदारांनी दिला आहे. लोकशाही मूल्यांवर जोर देत, खासदारांनी ट्रम्प यांना या महत्त्वपूर्ण भागीदारीला बळ देण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आवाहन केले आहे.
या धोरणामुळे भारत चीन आणि रशियाच्या अधिक जवळ जाण्याचा धोका असून, ही अमेरिकेच्या भू-राजकीय धोरणासाठी चिंतेची बाब आहे, असे महत्त्वपूर्ण भाकीत खासदारांनी केले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी भारत हा महत्त्वाचा भागीदार आहे, याची आठवणही त्यांनी ट्रम्प प्रशासनाला करून दिली.