दुबई : अमेरिकेची इराणवरील लष्करी कारवाई दोन ते तीन आठवड्यांत संपण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले. ते म्हणाले की, तेलाची वाहतूक व अन्य गोष्टींसाठी होर्मुझ सामुद्रधुनीवर अवलंबून आहेत, त्या देशांची या मार्गाच्या देखभालीची जबाबदारी असणार आहे. इराणने बुधवारी पहाटे कतारच्या किनाऱ्याजवळील एका तेल टँकरवर तसेच कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला. संभाव्य युद्धविरामाबाबत अमेरिकेशी थेट संपर्क झाल्याची पहिल्यांदाच कबुली दिली.
ट्रम्प यांनी याआधी आपल्या मित्रदेशांच्या असहकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. अमेरिका आता तुमच्या मदतीला नाही, तुम्हाला आवश्यक असलेले इंधन तेल स्वतःच मिळवा, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला होता. त्यावर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, अमेरिकेचे दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्याकडून आम्हाला युद्धविरामाबाबत निरोप मिळाला आहे. मात्र, कोणतीही थेट चर्चा झाली नसल्याचे अराघची यांनी ठामपणे सांगितले.
ट्रम्प यांनी सांगितले की, इराणने सध्या बंद केलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत भावी काळात काय घडामोडी होतील याच्याशी अमेरिकेचा काहीही संबंध राहाणार नाही. ही सामुद्रधुनी खुली ठेवण्याची जबाबदारी त्या मार्गावर अवलंबून असलेल्या देशांवर असणार आहे. जगातील २० टक्के तेलपुरवठा याच मार्गाने होतो.
कतारनजीक तेल टँकरवर, कुवेत विमानतळावर हल्ले
कतारच्या किनाऱ्याजवळ एका तेल टैंकरवर इराणने बुधवारी पहाटे कूझ क्षेपणास्त्राने हल्ला केला. कतार एनर्जीशी संबंधित असलेल्या या जहाजावरील २१ सदस्यीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यूएईमधील फुजैराह येथे पाडलेल्या ड्रोनचे अवशेष अंगावर पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुवेतमध्ये विमानतळावरील इंधन टाकीवर ड्रोन हल्ल्यामुळे मोठी आग लागली.
इस्रायलचा इराणवर मारा
इस्रायलने येमेन आणि इराणकडून होणाऱ्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. इराणमध्ये फेंटानिल या औषधाचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर हल्ला केल्याचा इस्रायलने दावा केला. या औषधाचा वापर रासायनिक शस्त्र कार्यक्रमासाठी होऊ शकतो. असे इस्रायलचे मत आहे.
लेबनॉनवर हल्ला, ५ ठार
इस्रायलने बैरुतमध्ये केलेल्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू व २१ जण जखमी झाले आहेत. इराणशी संबंधित हिजबुल्ला गटाने इस्रायलवर हल्ले सुरू केल्यानंतर इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये कारवाई सुरू केली. यात मोठ्या प्रमाणात इमारतींची पडझड, वाहनांचे नुकसानही झाले आहे.
इराणला युद्धविराम हवा : डोनाल्ड ट्रम्प
इराणच्या राष्ट्राध्यक्षांना युद्धविराम हवा आहे असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. पण त्यावर इराणने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणने लागू केलेले निर्बंध मागे घेऊन तो जलमार्ग सर्वांसाठी सुरक्षित झाल्यानंतरच युद्धविराम होणे शक्य होईल.
इस्रायलविरोधी शक्तींना पाठिंबा
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला मोजतबा खामेनेई यांनी सांगितले की, आम्ही पश्चिम आशियात इस्रायल विरोधी शक्तींना कायमच पाठिंबा देत राहाणार आहोत. त्यांचा हा संदेश वृत्तवाहिनीवर निवेदकाने वाचून दाखविला. खामेनेई यांनी म्हटले आहे की, आम्ही अमेरिकेलाही प्रखर विरोध करत आहोत.
बदलत्या भूमिकांमुळे अमेरिकी नागरिक गोंधळले
इराण युद्धात नाटो देशांकडून मदत मागण्यापासून ते त्यांची गरज नसल्याचे जाहीर करण्यापर्यंत, इराणच्या ऊर्जाविषयक पायाभूत सुविधांचा नाश करण्याचा इशारा देण्यापासून ते लगेच एका रात्रीतच अशा हल्ल्यांना स्थगिती देण्यापर्यंत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका महिन्यात आपल्या भूमिका वारंवार बदलल्या आहेत. त्यामुळे अमेरिकी नागरिक गोंधळले असून, 'ट्रम्प यांची वक्तव्ये उतावीळपणाचे लक्षण आहे,' अशी टीका करत आहेत.
इराणी प्रवाशांवर निर्बंध
संयुक्त अरब अमिरातीने युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणी नागरिकांना देशात प्रवेश किंवा ट्रान्झिट करण्यास बंदी घातली आहे, असे तीन प्रमुख विमान कंपन्यांनी सांगितले. एमिरेट्स, एतिहाद आणि फ्लायदुबई या कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवर ही माहिती दिली.
पुढील काही दिवसांत अमेरिका युद्धातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार
'अमेरिका हे युद्ध १०० टक्के जिंकू शकत नाही व इराण हे युद्ध पूर्णतः हरू शकत नाही' अशीच गत आजघडीला पश्चिम आशियामधल्या संघर्षाशी संबंधित झालेली आहे. दोन्हीही राष्ट्र युद्धामधून सन्मानपूर्वक बाहेर पडण्याची संधी शोधत आहेत. इराणच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाची फळी कापून काढण्या सोबतच इराणच्या लष्करी व अण्वस्त्र बनविण्याच्या क्षमतेला जबरदस्त हादरा दिला, असे सांगून या युद्धातून डोनाल्ड ट्रम्प कुठल्याही क्षणी विजयीमुद्रेने बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यासाठी विशेष लष्करी कारवाईसाठी अमेरिका इतर मित्रराष्ट्र व आखाती देशांच्या मदतीने भविष्यात कारवाई करू शकतो, परंतु तो इराण युद्धापासून हे 'स्पेशल ऑपरेशन' वेगळे ठेवण्याची शक्यता आहे. इस्रायलला पुढे करून अमेरिका युद्धातून बाहेर पडेल; परंतु येणाऱ्या काळात तो अप्रत्यक्षपणे इस्रायलला पाठिंबा देऊन पुढील कित्येक महिने इराणविरुद्ध युद्ध चालूच ठेवेल. यामुळे पुढे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार, हे नक्की!
Web Summary : President Trump indicated a possible end to military action against Iran within weeks. He accused Iran of attacks near Qatar and Kuwait, while Iran acknowledged US ceasefire messages. Tensions remain high over the Hormuz Strait, crucial for oil transport, with potential impacts on India.
Web Summary : राष्ट्रपति ट्रम्प ने कुछ हफ्तों में ईरान के खिलाफ सैन्य कार्रवाई समाप्त होने का संकेत दिया। उन्होंने ईरान पर कतर और कुवैत के पास हमलों का आरोप लगाया, जबकि ईरान ने अमेरिकी युद्धविराम संदेशों को स्वीकार किया। तेल परिवहन के लिए महत्वपूर्ण होर्मुज जलडमरूमध्य पर तनाव अभी भी अधिक है, जिसका भारत पर संभावित प्रभाव पड़ेगा।