तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 08:43 IST2026-01-13T08:43:31+5:302026-01-13T08:43:45+5:30
Iran Protest News: इराणमधील हिंसाचार आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी इमर्जन्सी अलर्ट जारी केला आहे. इराण सोडून जाण्याचे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाचे आदेश. सविस्तर वाचा.

तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
वॉशिंग्टन/तेहरान: इराणमधील अंतर्गत परिस्थिती अत्यंत स्फोटक झाली असून, अमेरिका आता 'वॉर मोड'मध्ये आल्याचे दिसत आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी रात्री एक आपत्कालीन सुरक्षा इशारा जारी केला आहे. यामध्ये इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व अमेरिकन नागरिकांना 'विनाविलंब' देश सोडण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
गेल्या दोन आठवड्यांपासून इराणमध्ये सरकारविरोधी तीव्र निदर्शने सुरू आहेत. ही आंदोलने चिरडण्यासाठी इराणच्या सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो जणांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
दुहेरी नागरिकत्व असलेल्यांना मोठा धोका
अमेरिकेच्या इशाऱ्यात विशेषतः दुहेरी नागरिकत्व असलेल्या व्यक्तींना सावध करण्यात आले आहे. इराणचे सरकार दुहेरी नागरिकत्व मान्य करत नाही, त्यामुळे अशा नागरिकांना इराणी नागरिक मानून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई, चौकशी किंवा छळ केला जाऊ शकतो. इराणमध्ये अमेरिकेचा कोणताही दूतावास नसल्यामुळे संकटकाळात मदत मिळणे अशक्य असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विमान सेवा विस्कळीत, रस्ते मार्गाचा पर्याय
इराणमधील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प करण्यात आली असून अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी १६ जानेवारीपर्यंत आपली उड्डाणे रद्द केली आहेत. त्यामुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांना आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे रस्ते मार्गाने बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील परिस्थितीवर कडक भूमिका घेतली असून, गरज पडल्यास लष्करी हस्तक्षेपाचे संकेत दिले आहेत. व्हाईट हाऊसच्या मते, जर इराणने 'रेड लाईन' ओलांडली, तर अमेरिका मोठी लष्करी कारवाई करू शकते.