इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 13:59 IST2026-04-05T13:58:16+5:302026-04-05T13:59:19+5:30
Iran-US War Update: इराणने इस्फहानमध्ये अमेरिकेचे C-130 विमान आणि २ ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स पाडले आहेत. अमेरिकन वैमानिकाच्या बचाव मोहिमेवर इराणने हा मोठा हल्ला केला आहे. वाचा सविस्तर.

इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले
मध्य-पूर्वेतील युद्धाने आता निर्णायक आणि भीषण वळण घेतले आहे. इराणच्या 'फराज रेंजर्स' या विशेष पोलीस कमांडो युनिटने इस्फहान प्रांतात अमेरिकेच्या C-130 हर्क्युलिस मालवाहू विमान पाडल्याचा खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकेने C-130 विमानाबाबत अद्याप मौन बाळगले आहे.
काही दिवसांपूर्वी इराणने अमेरिकेचे F-15 फायटर जेट पाडले होते. त्यातील एका बेपत्ता वैमानिकाला वाचवण्यासाठी अमेरिकेने इस्फहानमध्ये 'रेस्क्यू मिशन' राबवले होते. इराणचा दावा आहे की, याच मोहिमेत सामील असलेल्या C-130 विमानाला आणि दोन हेलिकॉप्टर्सना त्यांच्या एकात्मिक कमांडने (एयरोस्पेस, थल सेना आणि बासिज युनिट) लक्ष्य केले.
इराणच्या 'खातम अल-अंबिया' सेंट्रल मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ अमेरिकन विमानेच नव्हे, तर त्याच प्रांतात घिरट्या घालणाऱ्या एका इस्रायली ड्रोनलाही इराणच्या हवाई संरक्षण दलाने यशस्वीरित्या पाडले आहे. इस्फहान हा इराणच्या अण्वस्त्र तळांसाठी प्रसिद्ध असल्याने या भागात वाढलेली लष्करी हालचाल अत्यंत चिंताजनक मानली जात आहे.
अमेरिकेची भूमिका: संभ्रम कायम
अमेरिकेची दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स मिशन दरम्यान नष्ट झाल्याचा दावा इराणने केला आहे. C-130 या मोठ्या मालवाहू विमानाबाबत अमेरिकेने अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. तज्ज्ञांच्या मते, जर C-130 विमान खरोखरच पडले असेल, तर हा अमेरिकेसाठी गेल्या दशकातील सर्वात मोठा लष्करी धक्का ठरेल.