अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, जगात तणाव वाढला; पण भारताला ९००० कोटी रुपयांचा होऊ शकतो फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 19:08 IST2026-01-04T19:07:20+5:302026-01-04T19:08:08+5:30
भारत एकेकाळी व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलाचा मोठा आयातदार होता. भारत दररोज ४ लाख बॅरलपेक्षा जास्त तेल आयात करत असे. परंतु २०२० पासून ही परिस्थिती बिकट झाली

अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, जगात तणाव वाढला; पण भारताला ९००० कोटी रुपयांचा होऊ शकतो फायदा
अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केल्याने जगात तणाव वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलावर हल्ला करून तिथले राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली. मादुरो यांना न्यूयॉर्क येथील जेलमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अमेरिकेच्या या कारवाईनंतर व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रावर अमेरिकन नियंत्रण आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्चस्वामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीवर परिणाम पाहायला मिळू शकतो.
अमेरिकेच्या या एक्शनमुळे रशियासह अनेक देशांचं टेन्शन वाढले आहे मात्र भारतासाठी हे फायदेशीर ठरू शकते. व्हेनेझुएलाच्या तेलावरील अमेरिकेच्या नियंत्रणामुळे भारताच्या १ अब्ज डॉलर्सचे थकीत कर्ज फेडता येऊ शकते आणि उत्पादनात वाढ होऊ शकते. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रांचे अधिग्रहण किंवा पुनर्रचना भारताला थेट फायदा देऊ शकते असं तज्ज्ञांना वाटते. यामुळे अंदाजे १ अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे ९,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त) दीर्घकालीन कर्जाची परतफेड होऊ शकते. शिवाय अमेरिकेच्या नियंत्रणामुळे या लॅटिन अमेरिकन देशात भारत-संचालित क्षेत्रात कच्च्या तेलाचे उत्पादन वाढू शकते, जे आधीच अनेक निर्बंधांमुळे प्रभावित आहे.
व्हेनेझुएलावरील कारवाईवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, अमेरिकन तेल कंपन्या व्हेनेझुएलामध्ये एन्ट्री करतील आणि त्यांच्या खराब झालेल्या तेल पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करतील. आम्ही तेल व्यवसायात आहोत आणि त्यामुळे तेल कंपन्या नफा कसा कमवतात हे आम्हाला माहिती आहे असं त्यांनी सांगितले. भारत एकेकाळी व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलाचा मोठा आयातदार होता. भारत दररोज ४ लाख बॅरलपेक्षा जास्त तेल आयात करत असे. परंतु २०२० पासून ही परिस्थिती बिकट झाली. जेव्हा अमेरिकेच्या निर्बंधांमुळे आणि वाढत्या धोक्यांमुळे आयातीवर बंदी घालण्यात आली.
भारतातील प्रमुख परदेशी उत्पादक कंपनी ओएनजीसी विदेश लिमिटेड (ओव्हीएल) पूर्व व्हेनेझुएलातील सॅन क्रिस्टोबल तेल क्षेत्र संयुक्तपणे चालवते. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे २०२० पासून त्याचे कामकाज आणि तेल उत्पादन लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. यामुळे देशाचे साठे निष्क्रिय पडले आहेत आणि थकबाकी अडकली आहे. या सर्व समस्यांमुळे २०१४ पर्यंत या प्रकल्पातील ओव्हीएलच्या ४०% हिस्स्यावर व्हेनेझुएलाकडून देय असलेला ५३.६ कोटी डॉलर्सचा व्याज अडकले आहे. ऑडिट परवानगी नसल्यामुळे ही देणी चुकती होऊ शकली नाहीत.
भारताची अपेक्षा का वाढली?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेलावर नियंत्रण मिळवल्याने जागतिक बाजारपेठेत तिथून तेल निर्यात पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे. त्यामुळे भारताला सुमारे १ अब्ज डॉलर्सची प्रलंबित रक्कम मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. ओएनजीसी विदेश लिमिटेडला त्यांची थकबाकी वसूल करण्यास मदत होऊ शकते. अमेरिकेने लादलेल्या बंदी शिथिल केल्याने व्हेनेझुएलाचे तेल भारतात परत येऊ शकते.