US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 07:25 IST2025-06-22T07:24:20+5:302025-06-22T07:25:27+5:30
US Airstrikes Iran News: अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला केला. अमेरिकेची लढाऊ विमानांनी इराणमध्ये घुसून बॉम्ब टाकले.

US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
US Airstrikes Iran Update: इराणमध्ये घुसून अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा प्रकल्पांवर जोरदार हवाई हल्ला केला. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी एकाचवेळी बॉम्बचा वर्षाव केला. यात फोर्दो अणुऊर्जा केंद्राचे प्रचंड नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला इराणच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रावर हल्ला केल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यानंतर जगभरात खळबळ उडाली. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी एकाच वेळी बॉम्ब टाकले. सर्व विमान सुरक्षितपणे इराणच्या हद्दीतून बाहेर पडली आणि आपापल्या ठिकाणी पोहचली असेही ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेने इराणवर हल्ला कसा केला?
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले की, इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले करण्यासाठी इस्रायलने अमेरिकेला पूर्णपणे साथ दिली. या मोहिमेसाठी व्यवस्थित समन्वय ठेवण्यात आला होता. इराणवर हल्ला करण्यापूर्वी लढाऊ विमाने गुआम या तळावर आणली गेलेली होती.
अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, इराणमधील अणुऊर्जा केंद्रावर करण्यात आलेल्या हल्ल्यासाठी बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सचा वापर करण्यात आला. अमेरिकेच्या बंकर बस्टर्स बॉम्बमुळे इराणच्या अणुऊर्जा केंद्रांचे मोठे नुकसान झाले आहे.
अमेरिकेचा हल्ला, इराणने काय म्हटले आहे?
इराणमधील विभागीय अधिकाऱ्याने अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्याला दुजोरा दिला आहे. इस्फहान, नतांज आणि फोर्दो अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले करण्यात आले आहेत. काही तासांपूर्वी फोर्दो अणुऊर्जा केंद्रावर शूत्र राष्ट्राच्या हवाई दलाने हल्ले केले. फोर्दो येथे शुद्ध केलेले युरेनियम असून, बंकर बस्टर्स बॉम्बचा वापर करण्यात आला आहे.
इस्फहान प्रांताचे उप सुरक्षा गव्हर्नरनेही इस्फहान, नतांजमध्ये हल्ले झाल्याचे म्हटले आहे.
इस्फहान, नतांजमध्ये हल्ले झाले आहेत. एअर डिफेन्स प्रणाली सुरू करण्यात आलेली होती. पण, तरीही काही स्फोट झाल्याचे ऐकायला आले. अमेरिकेने हल्ले करण्यापूर्वीचे हे अणुऊर्जा केंद्र रिकामे करण्यात आले होते, असेही अधिकाऱ्यांनी इराणच्या माध्यमांशी बोलताना सांगितले.
इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीचे उप राजकीय संचालक हसन अबेदिनी यांनी सांगितले की, अणुऊर्जा केंद्र असलेली ठिकाणे आधीच रिकामे करण्यात आली होती.
इराणचे या हल्ल्यामध्ये कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. कारण तिथले पदार्थ आधीच दुसरीकडे हलवण्यात आले होते. कौम प्रांताचे आपत्ती व्यवस्थापन प्रवक्ते मोर्तजा हैदरी यांनी सांगितले की, फोर्दो अणुऊर्जा केंद्राचा एक मोठ्या भागाचे हल्ल्यामुळे नुकसान झाले आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी फोर्दो अणुऊर्जा केंद्र उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला आहे.