अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:04 IST2026-04-03T11:03:49+5:302026-04-03T11:04:18+5:30
US Military News: अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी आर्मी चीफ जनरल रैंडी जॉर्ज यांना तात्काळ निवृत्ती घेण्याचे आदेश दिले आहेत. इराण युद्धाच्या रणधुमाळीत हा निर्णय का घेतला?

अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय
इराणसोबत सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या दरम्यान अमेरिकेने आपल्या लष्करी नेतृत्वात मोठा बदल केला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी आर्मी चीफ ऑफ स्टाफ जनरल रैंडी जॉर्ज यांना तात्काळ निवृत्त होण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे पेंटागनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
जनरल रैंडी जॉर्ज यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता, मात्र त्यांना मुदतीपूर्वीच पद सोडण्यास भाग पाडले गेले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प प्रशासन आणि संरक्षण मंत्री हेगसेथ यांना लष्कराच्या सर्वोच्च पदी अशी व्यक्ती हवी आहे, जी त्यांच्या विचारसरणीनुसार काम करेल. रैंडी जॉर्ज यांची नियुक्ती जो बायडेन यांच्या काळात झाली होती आणि ते माजी संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांचे निकटवर्तीय मानले जात होते, हे त्यांच्या गच्छंतीचे एक मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांनी इराणवर लष्करी हल्ला करण्यास विरोध केल्याचेही सांगितले जात आहे. यामुळे त्यांना जबरदस्तीने निवृत्त होण्यास लावले जात आहे.
इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर बदल
हा बदल अशा वेळी झाला आहे जेव्हा अमेरिकन सैन्य इराणविरुद्ध मोठ्या लष्करी मोहिमेत गुंतलेले आहे. युद्धाच्या काळात लष्करी प्रमुखाला बदलणे ही एक असामान्य घटना मानली जाते. पेंटागनचे प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी या निवृत्तीची पुष्टी करताना म्हटले की, "जनरल जॉर्ज यांच्या दशकांच्या सेवेबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, परंतु आता नेतृत्वात बदल करण्याची वेळ आली आहे."
नवे लष्करी प्रमुख कोण?
रैंडी जॉर्ज यांच्यानंतर आता जनरल क्रिस्टोफर लानेव्ह अमेरिकन लष्कराची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे. लानेव्ह हे सध्या व्हाईस चीफ ऑफ स्टाफ असून ते हेगसेथ यांचे विश्वासू मानले जातात.