UAE मध्ये 5 भारतीयांना जॅकपॉट; एका भारतीयाने जिंकले तब्बल 45 कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 14:59 IST2023-11-17T14:58:10+5:302023-11-17T14:59:11+5:30
UAE Lottery Winner: केरळ आणि मुंबईचे रहिवासी युएईमध्ये लखपती-करोडपती झाले आहेत.

UAE मध्ये 5 भारतीयांना जॅकपॉट; एका भारतीयाने जिंकले तब्बल 45 कोटी रुपये
UAE Lottery Winner: भारतातून दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय नागरिक चांगल्या नोकरीसाठी दुबई आणि यूएईमध्ये जातात. यातील अनेकजण यूएईमधील लॉटरी जिंकून प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत. या वर्षीही पाच भारतीयांनी लॉटरी जिंकली आहे. यातील एकाने तर सुमारे 45 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे.
5 भारतीयांचे नशीब उजळले
संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणाऱ्या पाच भारतीयांचे लकी ड्रॉ मध्ये नाव आले आहे किंवा लॉटरी जिंकली आहे. या लोकांपैकी एक नियंत्रण कक्ष ऑपरेटर आहे, ज्याने AED 20,000,000 ची लॉटरी जिंकली आहे. ही रक्कम भारतीय चलनात अंदाजे 45 कोटी रुपये आहे. श्रीजू, असे या व्यक्तीचे नाव असून, तो केरळचा रहिवासी आहे. UAE च्या 'महजूज सॅटर्डे मिलियन्स' लॉटरीमध्ये त्याने पहिले पारितोषिक जिंकले आहे.
बुधवारी ड्रॉ जाहीर झाला
बुधवारी 154 वी सोडत जाहीर करण्यात आली, त्यात श्रीजूने सुमारे 45 कोटी रुपये जिंकले. केरळचा रहिवासी असलेला 39 वर्षीय श्रीजू, गेल्या 11 वर्षांपासून यूएईच्या फुजैराह येथे काम करतो. तो कामावर होता, तेव्हा त्याच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. श्रीजू आता या पैशातून भारतात एक मोठे घर घेण्याच्या विचारात आहे.
एकाने 11 लाख तर दुसऱ्याने 16 लाख रुपये जिंकले
'गल्फ न्यूज'नुसार, गेल्या शनिवारी 'एमिरेट्स ड्रॉ फास्ट5'मध्ये आणखी एका केरळच्या रहिवाशाने सुमारे 11 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले. याआधी 9 नोव्हेंबरला मुंबईतील 42 वर्षीय मनोज भावसार यांनी फास्ट 5 लॉटरीत सुमारे 16 लाख रुपये जिंकले होते. तसेच, 8 नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित 'दुबई ड्युटी फ्री मिलेनियम मिलेनियर' प्रमोशनमध्ये अनिल ग्यानचंदानी यांनी 1 मिलियन यूएस डॉलर्स जिंकले होते.