UAE सरकारचा मोठा निर्णय, पासपोर्टवर ‘असं’ नाव असलेल्या भारतीयांना आता ‘नो एन्ट्री’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 17:03 IST2022-11-24T17:02:24+5:302022-11-24T17:03:05+5:30
युएई सरकारनं टुरिस्टसह निरनिराळ्या प्रकारच्या व्हिसावर येणाऱ्या लोकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

UAE सरकारचा मोठा निर्णय, पासपोर्टवर ‘असं’ नाव असलेल्या भारतीयांना आता ‘नो एन्ट्री’
जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणीतरी लवकरच संयुक्त अरब अमिरातीला (UAE) जाण्याच्या तयारीत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. यूएई सरकारने प्रवास मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केला आहे. नवीन निर्देशांनुसार, आता जर कोणत्याही व्यक्तीच्या पासपोर्टवर फक्त एकच नाव लिहिलेले असेल, म्हणजे आडनावाचा कॉलम रिकामा असेल, तर तो यूएईला जाऊ शकत नाही आणि तिथूनही येऊ शकत नाही.
UAE सरकारच्या निर्देशानुसार सर्व प्रवाशांच्या पासपोर्टवर नाव आणि आडनाव दोन्ही स्पष्ट असणे आवश्यक आहे. 21 नोव्हेंबरपासून यूएईनेही हा नवा नियम लागू केला आहे. यूएई सरकारचा हवाला देत एअरलाइन्स कंपनी इंडिगोनेही एक निवेदन जारी केले आहे. इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे की, "यूएई सरकारच्या सूचनेनुसार, ज्या प्रवाशांच्या पासपोर्टवर एकच नाव आहे, मग ते पर्यटक असो किंवा कोणत्याही व्हिसावर, त्यांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही."
परमनंट व्हिसा असलेल्यांना सूट
जर कोणाला परमनंट व्हिसा असेल तर त्यांना त्यावर प्रवास करण्याची परवानगी असेल. यासाठी त्यांना पहिल्या आणि शेवटच्या नावाच्या कॉलममध्ये तेच नाव अपडेट करावे लागणार आहे. खलिज टाईम्सनं दिलेल्या रिपोर्टनुसार युएई सरकारनं याची घोषणा केल्यानंतर अनेकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
आम्ही दुतावासाकडून माहिती मिळण्याची वाट पाहत आहोत. यासाठी आम्ही लोकांना व्हिसा अप्लाय करण्यापूर्वी ४८ तासांचा वाट पाहण्याचा सल्ला देत आहोत, अशी प्रतिक्रिया एका ट्रॅव्हल कंपनीच्या कर्मचाऱ्यानं खलिज टाईम्सला दिली.