कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:49 IST2025-12-26T11:49:38+5:302025-12-26T11:49:59+5:30
भारतीयांच्या हत्येने टोरंटोत भीतीचे वातावरण!

कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
टोरंटो : कॅनडामध्ये अवघ्या दोन आठवड्यांच्या कालावधीत दोन भारतीय नागरिकांच्या हत्येच्या घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही घटना टोरंटो शहरात घडल्या असून, यामुळे भारतीय विद्यार्थी आणि समुदायामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ताज्या घटनेत टोरंटो विद्यापीठाच्या जवळ 20 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
शिवांक अवस्थी याची दिवसाढवळ्या हत्या
20 वर्षीय विद्यार्थी शिवांक अवस्थी याला मंगळवारी (23 डिसेंबर) टोरंटोमधील युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो स्कारबोरो (UTSC) कॅम्पसजवळील हायलँड क्रीक ट्रेल परिसरात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. शिवांक हा UTSC मध्ये लाइफ सायन्सेस शाखेत तिसऱ्या वर्षाचा अंडरग्रॅज्युएट विद्यार्थी होता. शिवांक UTSC च्या चीअरलीडिंग टीमचा सक्रिय सदस्य होता. या प्रकरणात अद्याप कोणत्याही संशयिताला अटक करण्यात आलेली नाही.
आठवड्याभरापूर्वी हिमांशी खुरानांची हत्या
गेल्या आठवड्यात हिमांशी खुराना (वय 30) या भारतीय तरुणीची टोरंटोमध्ये हत्या झाली होती. 20 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे 6.30 वाजता पोलिसांना हिमांशी मृतावस्थेत आढळून आली होती. 32 वर्षीय अब्दुल गफूरी याने ही हत्या केल्याचे उघड झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित आणि संशयित एकमेकांना ओळखत होते. या प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे.
भारतीय दूतावासाने व्यक्त केला शोक
दोन आठवड्यांत दोन भारतीय नागरिकांच्या हत्यांमुळे कॅनडातील भारतीय दूतावासाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, दूतावासाने पीडित कुटुंबीयांशी संपर्कात असल्याचे सांगत त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.
भारतीय समुदायात वाढती चिंता
कॅनडामध्ये, विशेषतः टोरंटोमध्ये, भारतीय विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सलग दोन हत्यांमुळे भारतीय समुदायात भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढत असून स्थानिक प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. कॅनडा पोलिसांकडून दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू असून लवकरात लवकर आरोपी पकडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.