दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ २ ड्रोन कोसळले, एका भारतीय नागरिकासह ४ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:34 IST2026-03-11T13:33:51+5:302026-03-11T13:34:09+5:30
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आज ड्रोन कोसळल्याने मोठी खळबळ उडाली.

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ २ ड्रोन कोसळले, एका भारतीय नागरिकासह ४ जण जखमी
Iran-Israel Crisis: दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ बुधवारी(दि.११) दोन ड्रोन कोसळल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेत एका भारतीय नागरिकासह चार जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र या घटनेचा विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसून, विमानतळावरील उड्डाणे नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
चार जण जखमी
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या घटनेत घानाचे दोन आणि बांग्लादेशच्या एका नागरिकासह एका भारतीय नागरिकाला छोटी-मोठी दुखापत झाली आहे. सुदैवाने सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने परिसराची तपासणी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुरक्षा प्रोटोकॉलनुसार संपूर्ण परिसरात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
Authorities confirm that two drones fell in the vicinity of Dubai International Airport (DXB) a short while ago, resulting in minor injuries to two Ghanaian nationals and one Bangladeshi national, and moderate injuries to one Indian national. Air traffic is operating as normal.
— Dubai Media Office (@DXBMediaOffice) March 11, 2026
विमान वाहतूक सुरळीत
दुबई मीडिया ऑफिसने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ दोन ड्रोन कोसळल्याची पुष्टी करण्यात आली आहे. मात्र, विमानतळावरील हवाई वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या घटनेमुळे विमानांच्या उड्डाणांवर किंवा विमानतळाच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही.
तपास सुरू
घटनेनंतर संबंधित सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला असून ड्रोन कुठून आले याबाबत चौकशी सुरू आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे विशेष लक्ष दिले जात आहे.