चीनसोबतच्या बैठकीपूर्वी इराण युद्ध संपविण्याचे टार्गेट; ट्रम्प म्हणाले, लवकर सोक्षमोक्ष लावा, मला इतरही अनेक कामे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 10:03 IST2026-03-26T10:02:43+5:302026-03-26T10:03:00+5:30
Trump Iran War Deadline Marathi: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्ध संपवण्यासाठी ४-६ आठवड्यांचा वेळ दिला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीपूर्वी शांती कराराचा प्रयत्न.

चीनसोबतच्या बैठकीपूर्वी इराण युद्ध संपविण्याचे टार्गेट; ट्रम्प म्हणाले, लवकर सोक्षमोक्ष लावा, मला इतरही अनेक कामे...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेले युद्ध अधिक लांबवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. येत्या काही आठवड्यांतच हे युद्ध संपवण्याचे लक्ष्य त्यांनी आपल्या सल्लागारांना दिले असून, मे महिन्याच्या मध्यावर होणाऱ्या चीन आणि शी जिनपिंग यांच्या भेटीपूर्वी इराणचा प्रश्न निकालात काढण्याचे त्यांचे नियोजन आहे.
'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी ४ ते ६ आठवड्यांची कालमर्यादा निश्चित केली आहे. मे महिन्यात बीजिंगमध्ये होणाऱ्या शिखर परिषदेपूर्वी मध्यपूर्वेतील तणाव निवळल्यास ट्रम्प यांना जागतिक स्तरावर आपली प्रतिमा अधिक मजबूत करता येईल, असा व्हाईट हाऊसचा अंदाज आहे.
ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसमोर एक प्रस्ताव ठेवला आहे, ज्यानुसार शांतता कराराच्या बदल्यात अमेरिका इराणच्या तेल साठ्यांपर्यंत थेट पोहोच मिळवू शकते. मात्र, यावर अद्याप कोणतीही अधिकृत योजना तयार झालेली नाही. ट्रम्प यांना युद्धापेक्षा आता देशांतर्गत मुद्द्यांवर, जसे की मध्यावधी निवडणुका, इमिग्रेशन आणि मतदार पात्रता कायदे, यावर लक्ष केंद्रित करायचे आहे.
वाढती जीवितहानी आणि राजकीय दबाव
युद्ध लांबल्यास अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूचा आकडा वाढू शकतो, ही ट्रम्प यांची मुख्य चिंता आहे. आतापर्यंत या युद्धात १३ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक जखमी झाले आहेत. तसेच, युद्धामुळे वाढलेली महागाई आणि फ्लोरिडासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टीचा झालेला पराभव यामुळे ट्रम्प यांच्यावर राजकीय दबाव वाढत आहे.
लष्करी कारवाईचा इशारा
एककीकडे कूटनीतिक चर्चा सुरू असली, तरी व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी इशारा दिला आहे की, जर इराण करारासाठी पुढे आला नाही, तर अमेरिका आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही.