Israel Iran War: "अमेरिकेकडं लढण्यासाठी अमर्याद शस्त्रसाठा", ट्रम्प यांचा दावा; पाहा काय आहे खरी परिस्थिती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 10:53 IST2026-03-04T10:52:04+5:302026-03-04T10:53:07+5:30
Israel Iran War News: इराणसोबत सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचा शस्त्रास्त्रांचा साठा वेगाने कमी होत असल्याची चिन्हे आहेत.

Israel Iran War: "अमेरिकेकडं लढण्यासाठी अमर्याद शस्त्रसाठा", ट्रम्प यांचा दावा; पाहा काय आहे खरी परिस्थिती?
इराणसोबत सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचा शस्त्रास्त्रांचा साठा वेगाने कमी होत असल्याची चिन्हे आहेत. ही कमतरता भरून काढण्यासाठी आणि शस्त्रास्त्रांचे उत्पादन युद्धपातळीवर वाढवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रशासन येत्या शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेतील सर्वात मोठ्या संरक्षण कंपन्यांच्या प्रमुखांशी एक महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहे.
या बैठकीसाठी लॉकहीड मार्टिन आणि रेथियनची मूळ कंपनी आरडीए यांसारख्या जगातील सर्वात मोठ्या शस्त्र पुरवठादार कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. इराणसोबतच्या युद्धाच्या पहिल्या चार दिवसांतच अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा वापर केला आहे, त्यामुळे वॉशिंग्टनमध्ये सध्या संरक्षणात्मक साठा मजबूत करण्यासाठी मोठी निकड निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून अमेरिका सातत्याने विविध संघर्षांमध्ये आपली शस्त्रास्त्रे वापरत आहे. एका अहवालानुसार, २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आणि गाझामध्ये इस्रायलने केलेल्या लष्करी कारवाईनंतर अमेरिकेने आधीच अब्जावधी डॉलर्स किमतीची शस्त्रे वापरली आहेत, यात तोफखाना प्रणाली, दारूगोळा आणि अनेक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडे शस्त्रांचा अक्षरशः अमर्याद साठा आहे आणि या पुरवठ्याचा वापर करून आम्ही दीर्घकाळ आणि यशस्वीरित्या युद्धे लढू शकतो," असा दावा केला आहे.
शस्त्रास्त्रांचे उत्पादन वाढवण्यासाठी केवळ चर्चाच नाही, तर मोठ्या निधीची तरतूदही केली जात आहे. अमेरिकेचे उपसंरक्षण सचिव स्टीव्ह फेनबर्ग सध्या पेंटागॉनसोबत मिळून ५० अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त बजेट प्रस्तावावर काम करत आहेत. हा प्रस्ताव या शुक्रवारपर्यंत अधिकृतपणे जारी केला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.