टिट फॉर टॅट...! 'IRIS Dena' चा बदला? अमेरिकेनं वॉरशिप बुडवलं तर इराणनं तेलाचा टँकर उडवला, आता समुद्रात थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 15:55 IST2026-03-05T15:55:35+5:302026-03-05T15:55:58+5:30
Israel US Iran War:

टिट फॉर टॅट...! 'IRIS Dena' चा बदला? अमेरिकेनं वॉरशिप बुडवलं तर इराणनं तेलाचा टँकर उडवला, आता समुद्रात थरार
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता समुद्राच्या पटलावरही सुरू झाले आहे. या युद्धाने आता रुद्र रूप धारण केले आहे. इराणच्या 'इस्लामिक रेवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) गुरुवारी दावा केला की, त्यांच्या नौदलाने उत्तर पर्शियन खाडीत एका अमेरिकन तेल टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला चढवला. IRGC च्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर संबंधित जहाजाने पेट घेतला, हे जहाज अद्यापही जळत आहे.
अमेरिकेच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर -
इराणी स्टेट मीडिया 'मेहर न्यूज'च्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला. 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून अमेरिका, इस्रायल अथवा त्यांना पाठिंबा देणाऱ्या युरोपीय देशांची लष्करी अथवा व्यापारी जहाजे जाऊ दिली जाणार नाहीत. अशी जहाजे दिसल्यास त्यांना लक्ष्य केले जाईल आणि युद्धाच्या काळात या समुद्री मार्गावर केवळ इराणचेच नियंत्रण असेल, असा इशारा IRGC ने दिला आहे.
टिट फॉर टॅट...! -
महत्वाचे म्हणजे, हिंदी महासागरात काही तासांपूर्वीच अमेरिकन पाणबुडीने इराणची युद्धनौका 'IRIS Dena' टॉरपीडोच्या सहाय्याने बुडवली. ही युद्धनौका भारतातील 'मिलन २०२६' नौदल सरावातून परतत होती. हिच्यावरील जवळपास १०० हून अधिक क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा बदला म्हणून Tit-for-Tat कारवाई करण्यात आल्याचे इराणने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, जगातील २०% तेल पुरवठा 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून होत असल्याने, या संघर्षाचा जागतिक इंधन पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, या हल्ल्यासंदर्भात अमेरिकेने अद्याप कुठल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही. यापूर्वी अमेरिकेने इराणचे असे दावे फेटाळून लावले आहेत. इराणने यापूर्वी तीन अमेरिकन-ब्रिटिश टँकरवर हल्ला करून सामुद्रधुनी "बंद" केल्याचा दावा केला होता. मात्र, अमेरिकेने इराणच्या नौदलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून त्यांची २० हून अधिक जहाजे बुडवली आहेत. सेंटकॉमच्या मते, इराणचे नौदल आता एक "स्मृती" जमा झाले आहे.