"अणुयुद्ध झाले असते, मी २००% टॅरिफ लावण्याची धमकी दिली म्हणून..."; भारत-पाकिस्तान युद्धावर काय म्हणाले ट्रम्प?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 11:51 IST2025-10-20T11:50:18+5:302025-10-20T11:51:34+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष मध्यस्थी करून थांबवल्याचा दावा केला आहे.

"अणुयुद्ध झाले असते, मी २००% टॅरिफ लावण्याची धमकी दिली म्हणून..."; भारत-पाकिस्तान युद्धावर काय म्हणाले ट्रम्प?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष मध्यस्थी करून थांबवल्याचा दावा केला आहे. त्यांनी "२००% टॅरिफ लावण्याची भीती दाखवल्यामुळे दोन्ही देशांनी युद्ध थांबवले", असे म्हटले आहे. मात्र, यावर भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी करार हा पूर्णपणे द्विपक्षीय असून, यात कोणत्याही तिसऱ्या देशाची भूमिका नव्हती, असे भारताने पुन्हा एकदा ठामपणे सांगितले आहे.
'सात विमाने पडली असती...'
फॉक्स न्यूजशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, "दोन्ही देशांमध्ये युद्ध जुंपले होते. त्यांची ७ विमाने खाली पडली होती. ही संख्या खूप मोठी आहे आणि ते युद्ध करण्याच्या तयारीत होते. दोन्ही देशांमध्ये अणुयुद्ध झाले असते."
आपल्या मध्यस्थीबद्दल बोलताना ते म्हणाले, "मी भारत आणि पाकिस्तानला जवळपास एकच गोष्ट सांगितली की, बघा जर तुम्ही एकमेकांशी लढलात, तर मी तुमच्यासोबत व्यापार करू शकणार नाही. याशिवाय मी २००% टॅरिफ लादेन, ज्यामुळे तुमच्यासाठी व्यापार करणे देखील अशक्य होईल."
रशियन तेल खरेदीवर थेट धमकी
दरम्यान, ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरही भारताला धमकी दिली आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी मला सांगितले आहे की, ते रशियन तेल खरेदी करणार नाहीत. पण जर त्यांनी तसे केले, तर त्यांना खूप मोठा टॅरिफ भरावा लागेल."
बुधवारीही ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमधून दावा केला होता की, पीएम मोदींनी त्यांना रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचे आश्वासन दिले आहे. तथापि, भारत सरकारने या दोन नेत्यांमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही संभाषणाची माहिती नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
अमेरिकेला निर्यात घटली
ट्रम्प प्रशासनाने २७ ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर ५०% शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर अमेरिकेला होणाऱ्या भारताच्या निर्यातीत मोठी घट झाली आहे, अशी माहिती CRISIL या रेटिंग एजन्सीच्या ऑक्टोबरच्या अहवालातून समोर आली आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये ७% वाढ नोंदवल्यानंतर, सप्टेंबरमध्ये अमेरिकेला होणारी व्यापारी निर्यात ११.९% नी कमी होऊन ५.५ अब्ज अमेरिकन डॉलरवर आली.
याउलट, बिगर-अमेरिकन बाजारपेठांमध्ये निर्यात सप्टेंबरमध्ये १०.९% ने वाढली, जी ऑगस्ट २०२५ मधील ६.६% वाढीपेक्षा अधिक आहे. CRISILने इशारा दिला आहे की, अमेरिकेचे शुल्क आणि जागतिक विकासातील मंदावलेला वेग यामुळे भारताच्या व्यापारी निर्यातीसमोर आव्हान उभे आहे.