...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:38 IST2025-07-02T17:35:26+5:302025-07-02T17:38:03+5:30
भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द केला. यानंतर, पाकिस्तानने भारतावर दबाव आणण्यासाठी, जगासमोर छाती झोडून घ्यायला सुरुवात केली. मात्र, याचाही भारतावर काहीही परिणाम झाला नाही...

...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
पहलगाम दहशतनादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द केला. यानंतर, हा करार पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पाकिस्तानने भारताकडे विनवण्या करायलया सुरुवात केली. मात्र भारताने त्यांच्या या विनवण्यांना काडीचीही किंमत दिली नाही. यावर पाकिस्तानने भारतावर दबाव आणण्यासाठी, जगासमोर छाती झोडून घ्यायला सुरुवात केली. मात्र, याचाही भारतावर काहीही परिणाम झाला नाही. अखेर आता, पाकिस्तानने आपल्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी नवी मार्ग शोधला आहे, मात्र यालाही, यापूर्वीच भारतासह स्थानिकांनीही विरोध दर्शवलेला आहे.
आपल्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी, त्यांची पाण्याची गरज भागवण्यासाठी पाकिस्तानने आता आपली पाणी साठवण क्षमता वाढवण्याची योजना आखली आहे. शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी (१ जुलै २०२५) भारतावर पाण्याचा वापर शस्त्राप्रमाणे करत असल्याचा आरोप केला आणि म्हणाले, सरकारने पाणी साठवण क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला असून, डायमर भाषा धरण आणि इतर संसाधनांचा वापर करून, वादग्रस्त नसलेली पाणी साठवण क्षमता निर्माण केली जाईल.
कुठे तयार होतोय डायमर भाषा धरण? -
डायमर भाषा धरण हे खैबर पख्तूनख्वातील कोहिस्तान आणि गिलगिट-बाल्टिस्तानमधील डायमर जिल्ह्यांदरम्यान बांधले जात आहे. त्याचे बांधकाम इम्रान खान सरकारच्या काळातच सुरू झाले होते. मात्र, यावर भारताने आक्षेप घेतला आहे. कारण हे धरण बेकायदेशीर भागात बांधले जात होते. एवढेच नाही तर, स्थानिक लोकांचाही या धरणाला विरोध आहे. जोवर त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोवर धरण बांधू दिले जाणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, १९९१ मध्ये प्रांतांमध्ये झालेल्या पाणी करारात पाण्याची क्षमता वाढवण्याची तरतूद आहे. आम्ही आमच्या संसाधनांचा वापर करून पुढील वर्षापर्यंत या धरणाचे काम पूर्ण करू, असेही शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.