इराणमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, सर्वोच्च नेते खोमेनी रशियाला पळून जाण्याचा तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 10:18 IST2026-01-05T10:02:45+5:302026-01-05T10:18:09+5:30
इराणमध्ये दिवसेंदिवस निदर्शने वाढत आहेत. दरम्यान, जर सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांची राजवट कोसळली तर ते मॉस्कोला पळून जाऊ शकतात, अशी माहिती गुप्तचर अहवालातून समोर आली आहे.

इराणमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, सर्वोच्च नेते खोमेनी रशियाला पळून जाण्याचा तयारीत
मागील काही दिवसांपासून इराणमध्ये सरकारविरोधात निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशातील वाढत्या उठावादरम्यान, सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी मॉस्कोला पळून जाऊ शकतात. जर इराणमध्ये त्यांची राजवट कोसळली तर खोमेनी मॉस्कोला जाऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे.
जर इराणच्या सुरक्षा संस्था वाढत्या निदर्शनांना दडपण्यात किंवा अशांततेत त्यांना सोडून देण्यात अपयशी ठरल्या तर ८६ वर्षीय खोमेनी तेहरान सोडून आपल्या सहाय्यकांसह आणि कुटुंबातील सदस्यांसह देश सोडून पळून जातील, असे एका अहवालात म्हटले आहे.
खोमोनींचा प्लॅन बी काय?
एका गुप्तचर सूत्राने एका ब्रिटिश वृत्तपत्राला सांगितले की, खोमेनींचा प्लॅन बी म्हणजे त्यांचे जवळचे सहकारी आणि कुटुंब, यामध्ये त्यांचा मुलगा आणि नियुक्त उत्तराधिकारी मोज्तबा यांचा समावेश आहे, देश सोडणे. या योजनेअंतर्गत, ते त्यांच्या जवळच्या २० सहाय्यक आणि कुटुंबातील सदस्यांसह इराण सोडू शकतात.
यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि खोमेनी यांचे सहयोगी असलेले तत्कालीन सीरियन राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद बंडखोरांनी सत्ता काबीज केल्यानंतर मॉस्कोला पळून गेले.
जर त्यांना पळून जाण्याची गरज भासली तर त्यांनी तेहरानमधून बाहेर पडण्याचा मार्ग आधीच आखला आहे, यामध्ये सुरक्षित बाहेर पडण्यासाठी परदेशात मालमत्ता गोळा करणे समावेश आहे.
जूनमध्ये इस्रायलशी झालेल्या १२ दिवसांच्या युद्धानंतर खोमेनी आता मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
देशभरात निदर्शने वाढत आहेत
इराणमध्ये वाढती आर्थिक संकटे, महागाई आणि घसरत्या चलनामुळे जनतेचा रोष निर्माण झाला. तेहरानमधील दुकानदारांनी संप पुकारला आणि निदर्शने देशभरात झपाट्याने पसरली. महागाईचा निषेध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आणि सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. अनेक ठिकाणी जाळपोळ होत आहे.
मानवाधिकार संघटनांनी रविवारी सांगितले की, इराणमध्ये एका आठवड्यात सुरू असलेल्या अशांततेत किमान १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण आठवड्यात मृत्यू आणि अटकेच्या बातम्या समोर आल्या आहेत.
गेल्या तीन वर्षातील हे सर्वात मोठे निदर्शने मानले जातात. बिघडत चाललेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे इराण सध्या असुरक्षित स्थितीत आहे.