अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 06:55 IST2025-10-04T06:54:49+5:302025-10-04T06:55:09+5:30
स्वीडनचे मुंबईतील महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांचे मत, लोकमत कार्यालयाला भेट

अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
मुंबई : सध्या अमेरिका दिवसागणिक नवनवे टॅरिफ लावत आहे. परिणामी विविध देशांचे अमेरिकेसोबत जे आदान - प्रदान व्यवहार होतात त्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. तसेच जागतिक अर्थकारणामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता इतर देशांनी नव्या बाजारपेठा शोधत व्यवसाय विस्तार करणे गरजेचे आहे आणि अशावेळी भारत आणि युरोपियन युनियनमधील देश महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे स्पष्ट मत स्वीडनचे मुंबईतील महावाणिज्यदूत स्वेन ओस्टबर्ग यांनी व्यक्त केले.
स्वेन ओस्टबर्ग यांनी शुक्रवारी लोकमतच्या मुंबई कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेन्द्र दर्डा, लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी, लोकमतचे सिनियर प्रेसिडंट बिजॉय श्रीधर यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी भाजपच्या इंटलेक्चुअल सेलचे (कोकण विभाग) परिक्षित धुमे हेदेखील उपस्थित होते.
भारत आणि स्वीडन यांच्यातील व्यापारी संबंधांना नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली. याचा आढावा घेताना ओस्टबर्ग म्हणाले की, १९५० साली पुण्यात एसकेएफ या स्वीडीश कंपनीने पहिल्यांदा आपले काम सुरू केले. त्यानंतर सरत्या ७५ वर्षांमध्ये आतापर्यंत एकूण २८० स्वीडीश कंपन्या भारतात कार्यरत आहेत. यापैकी १०५ कंपन्या पश्चिम भारतात कार्यरत आहेत. भारतामधील स्वीडीश कंपन्या या प्रामुख्याने उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहेत. आमच्या कंपन्या येथे १०० टक्के उत्पादन करतात. त्यांची विक्री भारत, अमेरिका, युरोपियन देश तसेच अन्य बाजारपेठांतून करतात. यावरून दिसून येते की, भारतीय उत्पादनांची गुणवत्ता किती उच्च दर्जाची आहे. स्वीडनमध्येही भारतीय कंपन्यांची संख्या वाढत आहे.
स्वीडनमध्ये सध्या ७० भारतीय कंपन्या कार्यरत आहेत. यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमाण अधिक असले तरी उत्पादन क्षेत्रातील कंपन्यादेखील सक्रिय आहेत. डिजिटल आणि हरित उर्जा क्षेत्रातील कंपन्या स्वीडनमध्ये याव्यात, यासाठी आम्ही सक्रिय आहोत, असेही ते म्हणाले.
हरयाणामध्ये बनविणार खांद्यावरचे रॉकेट लाँचर
भारताने आता संरक्षण क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांना उत्पादन बनविण्याची अनुमती दिली आहे. या पार्श्वभूमीवर स्वीडनमधील ‘सॉब’ ही संरक्षण साहित्याचे उत्पादन करणारी अग्रणण्य कंपनी हरयाणा येथे खांद्यावरच्या रॉकेट लाँचरची निर्मिती करणार असल्याची माहिती ओस्टबर्ग यांनी दिली.
युक्रेनला पाठिंबा : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, जगात आम्ही पाचव्या क्रमांकाचा देश आहे जो संरक्षण आणि नागरी सेवेच्या पातळीवर त्यांना मदत करत आहे, असेही ओस्टबर्ग यांनी सांगितले.
७० हजार भारतीय स्वीडनमध्ये : आजच्या घडीला ७० हजार भारतीय स्वीडनमध्ये आहेत. यापैकी निम्मे विद्यार्थी असून, ते विज्ञान व तंत्रज्ञानाचे शिक्षण घेत आहेत, तर निम्मे भारतीय तेथे काम करत आहेत, अशी माहिती ओस्टबर्ग यांनी दिली.