चीनमधून आलेल्या कोरोनाच्या नव्या सब व्हेरिअंटचा कहर, अमेरिकेत एका आठवड्यात 350 जणांचा मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:10 IST2025-05-28T11:08:37+5:302025-05-28T11:10:51+5:30
सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार 18 तेहून अधिक वय असलेल्या 23 टक्के लोकांना 24 एप्रिलपर्यंत कोरोनाची नवी लस देण्यात आली आहे.

चीनमधून आलेल्या कोरोनाच्या नव्या सब व्हेरिअंटचा कहर, अमेरिकेत एका आठवड्यात 350 जणांचा मृत्यू!
चीनमधून आलेल्या कोविड-19 च्या नव्या सब व्हेरिअंटने अमेरिकेत हाहाकार घालायला सुरुवात केल्याचे दिसते. कोरोनामुळे तेथे एका आठवड्यात 350 जणांचा मृ्त्यू झाल्याचे वृत्त आहे. 'अमेरिकेत गेल्या एका आठवड्यात 350 जणांचा
कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील बहुतांश लोक उच्च-जोखीम गटातील होते,' असे सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या अमेरिकेच्या आरोग्य एजन्सीने म्हटले आहे.
अमेरिकेत कोरोनाचा नवा सब व्हेरिअंट -
सध्या अमेरिकेत कोरोना व्हायरसचा नवा सब व्हेरिअंट NB.1.8.1 हाहाकार घालताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, चीनसह सिंगापूर, हाँगकाँग, थायलंड सारख्या आशिया खंडातील देशांतही हा नवा सब व्हेरिअंट वेगाने पसरताना दिसत आहे.
अमेरिकेतील एका विमानतळावर परदेशी नागरिकाची तपासणी सुरू असतानाच हा नवा सब व्हेरिअंट आढळून आला होता. आता न्यूयॉर्क, कॅलीफोर्निया, वॉशिंग्टन, व्हर्जीनियासह अमेरिकेतील अनेक मोठ्या शहरात हा व्हिरिअंट वेगाने पसरत आहे. जपान, दक्षिण कोरिया आणि फ्रान्समध्येही हा व्हायरस पोहोचला आहे.
महत्वाचे म्हणजे, कोरोना व्हॅक्सीनची कमी होणारी क्षमता, हे देखील कोरोना पसरण्यामागचे एक मुख्य कारण मानले जात आहे. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार 18 तेहून अधिक वय असलेल्या 23 टक्के लोकांना 24 एप्रिलपर्यंत कोरोनाची नवी लस देण्यात आली आहे.
एट्रिया रिसर्च इंस्टीट्यूटच्या व्हॅक्सीन तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नवी व्हॅक्सीन घेणाऱ्यांची संख्या कमी, हे देखील एक कारण आहे. तसेच, व्हॅक्सीनचा डोस घेतल्यानंतरही, कदाचित आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती नव्या विषाणूचा प्रतिकार निर्माण करू शकणार नाही, असेही होऊ शकते. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. वय आणि गंभीर आजार हे देखील मृत्यूचा धोका वाढवणारे एक कारण आहे. तज्ज्ञांनी ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सहा महिन्यांच्या अंतराने कोरोना व्हॅक्सीनचे दोन डोस घेण्याचा सल्ला दिला आहे. महत्वाचे म्हणजे, या संसर्गामुळे, अमेरिकेत अँटी व्हायरल पिल molnupiravir, Paxlovid आणि रेमेडिसिविरची विक्री वाढली आहे.