ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 06:00 IST2025-11-23T05:58:47+5:302025-11-23T06:00:02+5:30
दहशतवाद आणि ड्रग्ज तस्करी ही एकमेकांना पूरक अशी गुन्हेगारी साखळी असून त्याविरोधात देशांनी एकत्रितपणे लढणे गरजेचे आहे असं मोदी म्हणाले, जी-२० बैठकीत ते बोलत होते.

ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
जोहान्सबर्ग - आजच्या विकास मॉडेलने मोठ्या लोकसंख्येला संसाधनांपासून वंचित ठेवले आहे आणि निसर्गाच्या अतिरेकी शोषणाला चालना दिली आहे. त्यामुळे जागतिक विकासाच्या निकषांबाबत पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे आयोजित जी-२० गटाच्या बैठकीत केले.
दहशतवाद आणि ड्रग्ज तस्करी ही एकमेकांना पूरक अशी गुन्हेगारी साखळी असून त्याविरोधात देशांनी एकत्रितपणे लढणे गरजेचे आहे. माहितीविनिमय, तांत्रिक सहकार्य आणि मजबूत कायदेविषयक यंत्रणा यांच्या मदतीनेच हा धोका कमी करता येईल, असेही मोदी यांनी यावेळी नमूद केले. सांस्कृतिक, सामाजिकदृष्ट्या उत्तम आणि पर्यावरणपूरक जीवनशैली जपण्यासाठी जागतिक पारंपरिक ज्ञानाचे योग्य प्रकारे जतन व्हावे. त्यासाठी भारताची संस्कृती, तसेच समग्र मानवतावादाचे तत्त्व यातून सर्वांना उत्तम मार्गदर्शन मिळेल, असेही ते म्हणाले.
The second session at the G20 Summit in Johannesburg focussed on building a resilient world in the face of disasters, climate change and ensuring energy transitions that are just as well as robust food systems. India has been actively working on all these fronts, building a… pic.twitter.com/Iqvh81CxUj
— Narendra Modi (@narendramodi) November 22, 2025
फक्त आर्थिक प्रश्नच नव्हे, सुरक्षेचीही जबाबदारी
पंतप्रधान म्हणाले, ड्रग्ज-आतंकी नेटवर्कला मिळणारा निधी, त्यांना दिले जाणारे आश्रयस्थान आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय जाळे या सर्वांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. जी-२० हे फक्त आर्थिक प्रश्नांपुरते मर्यादित नाही. जगाच्या सुरक्षिततेची जबाबदारीही आपल्यावर आहे. जागतिक प्रगतीसाठी आफ्रिका खंडाची प्रगती होणेही तितकेच आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडात तंत्रज्ञान सहकार्याचे नवे पर्व
भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या तीन देशांमध्ये तंत्रज्ञानविषयक सहकार्याचे नवे पर्व सुरू होत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी केली. जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि कॅनडाचे मार्क कानीं यांची भेट घेतल्यानंतर मोदी यांनी सांगितले की, तीन देशांच्या सहकार्यामुळे एआयच्या व्यापक वापरासह अनेक गोष्टींना चालना मिळणार आहे.