इराणमधील राजवटीचा विनाश अटळ; अमेेरिकेकडून इराणला कठोर प्रत्युत्तराची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 05:39 IST2026-03-14T05:39:05+5:302026-03-14T05:39:25+5:30

इराणचे आखाती देश व इस्रायलवर नवे हल्ले, इस्रायलचे इराणवर २०० ठिकाणी हल्ले, अमेरिकेचे इंधनपुरवठा विमान कोसळून सर्व कर्मचारी ठार, १ फ्रेंच सैनिक ठार

The destruction of the regime in Iran is inevitable; America threatens Iran with a harsh response | इराणमधील राजवटीचा विनाश अटळ; अमेेरिकेकडून इराणला कठोर प्रत्युत्तराची धमकी

इराणमधील राजवटीचा विनाश अटळ; अमेेरिकेकडून इराणला कठोर प्रत्युत्तराची धमकी

दुबई : इराणने शुक्रवारी पहाटे आखाती अरब देशांवर आणि इस्रायलवर नवे हल्ले केले. यात सौदी अरेबियावर डझनाहून अधिक ड्रोन डागण्यात आले तर ओमान, बहरिन आणि दुबईतही स्फोट, सायरन आणि आगीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व संरक्षणमंत्री हेगसेथ यांनी इराणवर परत मोठ्या प्रमाणात हल्ले केले जातील, अशी धमकी दिली. आपल्या ट्रूथ सोशल या वेबसाइटवर ट्रम्प यांनी अमेरिका इराणच्या दहशतवादी शासनाचा लष्करी, आर्थिक आणि इतर सर्व मार्गांनी नाश करीत असल्याचे विधान केले आहे. 

‘मोज्तबा गंभीर जखमी’

मोज्तबा खामेनेई हे अमेरिका, इस्रायलने केलेल्या संयुक्त लष्करी कारवाईत अतिशय गंभीर जखमी  जखमी झाले आहेत असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री पिट हेगसेथ यांनी शुक्रवारी सांगितले. मोज्तबा यांनी गुरुवारी अमेरिकेवर हल्ले चालूच ठेवू अशी धमकी दिली होती. 

तेहरानवर तीव्र हवाई हल्ले

इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणची राजधानी तेहरान परिसरात तीव्र हवाई हल्ले केले. पॅलेस्टिनी समर्थनार्थ दरवर्षी होणाऱ्या ‘कुद्स डे’ कार्यक्रमाच्या आधीच हे हल्ले झाले. इस्रायलने बुधवारी रात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंतच्या २४ तासांत इराणमधील २०० हून अधिक लक्ष्यांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे. यात क्षेपणास्त्र प्रक्षेपण प्रणाली, हवाई संरक्षण व्यवस्था आणि शस्त्रनिर्मिती केंद्रांचा समावेश आहे.

तेलाच्या किमती वाढल्या

होर्मूझ सामुद्रधुनीत इराणने जहाजांच्या हालचाली रोखल्यामुळे तेलाच्या किमती १०० डॉलर प्रति बॅरलपेक्षा वरच राहिल्या आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर ब्रेंट क्रूडची किंमत काही काळ १२० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली असून, ती आता ४० टक्क्यांनी जास्त आहे. 

अमेरिकेचे लष्करी विमान कोसळले, ६ कर्मचारी ठार

पश्चिम इराकमध्ये केसी-१३५ हे इंधनपुरवठा विमान कोसळून सर्व ६ कर्मचारी ठार झाल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिली. या विमानात ६ कर्मचारी होते. ‘हा अपघात होता; तो हल्ला नव्हता,’ असेही अमेरिकेने स्पष्ट केले. इराणविरुद्धच्या कारवाईदरम्यान कोसळलेले हे चौथे अमेरिकी विमान आहे.

इराकमध्ये फ्रेंच सैनिक ठार

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले की, इराकमधील कुर्द प्रदेशातील इरबिल येथे झालेल्या हल्ल्यात एक फ्रेंच सैनिक ठार झाला. त्याआधी ड्रोन हल्ल्यात सहा फ्रेंच सैनिक जखमी झाले होते. इरबिलमध्ये इस्लामिक स्टेटविरोधातील बहुराष्ट्रीय मोहिमेअंतर्गत फ्रेंच, ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्य तैनात आहे.

तेलावरील निर्बंध सैल 

अमेरिकेने वाढत्या तेल किमती लक्षात घेऊन रशियाच्या तेलावर घातलेले काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे इतर देश आता आखातात अडकलेल्या रशियाच्या तेलाची तात्पुरती खरेदी करू शकणार आहेत. यापूर्वी भारतालाही अशाच प्रकारची सवलत देण्यात आली होती. २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धानंतर वाढलेल्या तेल किमती कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 

तेहरानमध्ये प्रसिद्ध फिर्दौस चौकात स्फोट, १ महिला ठार 

दुबई : इराणची राजधानी तेहरानमधील प्रसिद्ध फिर्दौसी चौकात शुक्रवारी हजारो लोक ‘कुद्स डे’च्या सरकारी सभेसाठी जमले असताना त्या परिसरात मोठा स्फोट झाला. पॅलेस्टिनी समर्थनार्थ आयोजित या सभेत इस्रायलविरोधी घोषणा दिल्या जात असतानाच हा स्फोट झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट कोणी घडवून आणला याबाबत मात्र अद्याप अधिकृत माहिती इराणने दिलेली नाही. 

स्फोटापूर्वी काही वेळ आधी इस्रायलने सोशल मीडियातून फार्सी भाषेत नागरिकांना हा परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला होता. मात्र युद्धामुळे इराणमध्ये इंटरनेट सेवा मोठ्या प्रमाणात बंद असल्याने हा इशारा बहुतांश लोकांपर्यंत पोहोचला नसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आखातावर ड्रोनहल्ले

गुरुवारी रात्री व शुक्रवारी आखाती प्रदेशातील तेल आणि औद्योगिक पायाभूत सुविधांवर इराणने हल्ले सुरूच ठेवले आहेत. सौदी अरेबियाने इराणच्या जवळपास ५० ड्रोनना शुक्रवारी पहाटे पाडले. ओमानमधील सोहार औद्योगिक क्षेत्रात दोन ड्रोन कोसळल्याने दोन जण ठार झाले.

तर बहरिनमध्ये संभाव्य हल्ल्यांच्या इशाऱ्यामुळे सायरन वाजविण्यात आले. दुबईमध्ये ड्रोन अवशेषांमुळे औद्योगिक भागात आग लागली आणि दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरमधील एका इमारतीचे नुकसान झाले. इराणने यापूर्वी तेहरानमधील एका बँकेवर केलेल्या हल्ल्यानंतर बँका आणि वित्तीय संस्थांना लक्ष्य केले जाईल, असा इशारा दिला होता.

लेबनॉन-इस्रायल सीमेवरही संघर्ष

लेबनॉनमधील हिज्बुल्लाने इस्रायलवर रॉकेटहल्ले केले. उत्तरेकडील इस्रायलमध्ये सुमारे ६० जण जखमी झाले; मात्र, बहुतेक जखमा किरकोळ असल्याचे सांगण्यात आले. इस्रायली हल्ल्यात बैरुतमध्ये एक जण ठार झाला.
लेबनॉनच्या पूर्व भागातील एका अपार्टमेंटवर झालेल्या हल्ल्यात मुस्लीम ब्रदरहूडशी संबंधित एका स्थानिक अधिकाऱ्याच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. लेबनॉनमध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून ६०० हून अधिक जण ठार झाले असून, सुमारे ८ लाख लोक विस्थापित झाले आहेत.

इराणचे सामर्थ्य संपवले

आज या विकृत दहशतवाद्यांचे काय होते ते पाहा. त्यांच्या अनेक नेत्यांना कायमचे हटविण्यात आले आहे. गेल्या ४७ वर्षांत त्यांनी जगभर निरपराध लोकांना ठार केले. आता अमेरिकेचा ४७वा राष्ट्राध्यक्ष म्हणून मी त्यांना संपवत आहे. 
डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

खामेनेई हे फक्त बाहुले

मोज्तबा खामेनेई हे रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे बाहुले असून, खरी सत्ता रिव्होल्युशनरी गार्ड्सकडेच  आहे. इस्रायलने इराणच्या लष्करी व सुरक्षा संरचनेला कमकुवत केले आहे. तेथे बदल घडण्याची शक्यता वाढली आहे. 
बेंजामिन नेतान्याहू, पंतप्रधान इस्रायल

खामेनेई जखमी अन् स्थिर 

मोज्तबा खामेनेई त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात जखमी झाले होते, पण त्याची प्रकृती आता स्थिर आहे, ते ईदच्या नमाजात सामील होण्याची शक्यता आहे. इराणच्या नौदलाने होर्मूझ सामुद्रधुनीवर पूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले आहे. 
मीर होसैनियन, राजदूत ट्युनिशिया

उंदीर असेच करतात

इराणचे नेतृत्व चांगल्या स्थितीत नाही. ते हताश झाले असून लपून बसले आहे. उंदीर असेच करतात. आम्हाला माहिती आहे की तथाकथित नवे सर्वोच्च नेते जखमी झाले असून त्यांचा चेहरा विद्रूप झाला असण्याची शक्यता आहे. 
पीटर हेगसेथ, संरक्षणमंत्री अमेरिका

Web Title : ईरान शासन का पतन अनिवार्य; अमेरिका की कड़ी प्रतिक्रिया की धमकी

Web Summary : ईरान द्वारा खाड़ी देशों और इजरायल पर हमलों के बाद, अमेरिका ने जवाबी कार्रवाई की धमकी दी। इजरायल ने तेहरान पर हमला किया, ईरानी सैन्य संपत्तियों को निशाना बनाया। शिपिंग व्यवधानों के कारण तेल की कीमतें बढ़ीं। इराक में एक अमेरिकी सैन्य विमान दुर्घटनाग्रस्त हो गया। क्षेत्रीय संघर्ष तेज होने से तनाव बढ़ गया, जिससे वैश्विक स्थिरता प्रभावित हुई।

Web Title : Iran Regime's Demise Inevitable; US Threatens Strong Retaliation

Web Summary : Following Iranian attacks on Gulf states and Israel, the US threatened retaliation. Israel struck Tehran, targeting Iranian military assets. Oil prices surged due to shipping disruptions. An American military plane crashed in Iraq. Tensions escalate as regional conflicts intensify, impacting global stability.