जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश हादरला, १७ जणांचा बळी; भूस्खलनानंतर बसले दोन मोठे भूकंपाचे धक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:02 IST2025-11-27T14:01:27+5:302025-11-27T14:02:01+5:30
भूस्खलनामुळे कमीतकमी ४००० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक लोक बेघर झाले असून त्यांना तात्पुरत्या मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.

जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश हादरला, १७ जणांचा बळी; भूस्खलनानंतर बसले दोन मोठे भूकंपाचे धक्के
जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशामध्ये, इंडोनेशियामध्ये, निसर्गाचा मोठा कोप झाल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून भूस्खलनामुळे त्रस्त असलेल्या सुमात्रा बेटाला आज एका पाठोपाठ एक असे भूकंपाचे दोन मोठे धक्के जाणवले आहेत. यातील एका भूकंपाची तीव्रता ६.६ रिश्टर स्केल इतकी प्रचंड होती. गेल्या तीन दिवसांत भूस्खलनामुळे सुमात्रा येथे १७ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत.
भूकंपाच्या या दोन्ही धक्क्यांचे केंद्र सुमात्राजवळ असलेल्या सिमुलुए नावाच्या छोट्या बेटावरील सिनाबंग शहर होते. पाहिला धक्का हा सकाळी १०च्या सुमारास जाणवला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.६ इतकी नोंदवली गेली. तर, दुसरा धक्का हा दुपारी १२च्या आसपास जाणवला आणि त्याची तीव्रता ४.४ इतकी होती. भूकंपामुळे नेमके किती नुकसान झाले आहे, याचा अधिकृत अहवाल अद्याप इंडोनेशिया सरकारने जारी केलेला नाही. मात्र, यावर्षी इंडोनेशियात जाणवलेला हा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे.
भूस्खलनाने आधीच हादरले सुमात्रा
इंडोनेशिया सध्या भूस्खलनाच्या मोठ्या संकटाशी झुंज देत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सुमात्रा भागात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. बुधवारपर्यंत भूस्खलनामुळे १७ लोकांचा बळी गेला आहे, तर अनेक लोक अद्याप बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे.
इंडोनेशियाच्या पोलीस विभागाच्या माहितीनुसार, या भूस्खलनामुळे कमीतकमी ४००० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक लोक बेघर झाले असून त्यांना तात्पुरत्या मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.
रिंग ऑफ फायरमुळे अतिसंवेदनशील
अमेरिकेच्या जिओलॉजिकल विभागानुसार, ६.६ तीव्रतेच्या भूकंपाची खोली १६ मैल इतकी होती आणि हे धक्के सुमारे ७ सेकंदांपर्यंत जाणवले. हिंद महासागराच्या किनाऱ्यावर स्थित असलेला इंडोनेशिया दक्षिण पूर्व आशियातील एक महत्त्वाचा देश आहे. जगात सर्वात जास्त १७,००० बेटे असलेला हा देश 'रिंग ऑफ फायर'च्या पट्ट्यात येतो. यामुळे हा भाग भूकंपांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. इंडोनेशियाची एकूण लोकसंख्या सुमारे २८ कोटी असून, त्यापैकी ८७ टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे.