वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 17:37 IST2025-11-27T17:36:42+5:302025-11-27T17:37:20+5:30
या अपघातात रेल्वे ट्रॅकवर देखभालीचे काम करणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांचा ट्रेनच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे.

वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
चीनच्या दक्षिण-पश्चिम भागात आज पहाटे एक अत्यंत वेदनादायक आणि भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. युन्नान प्रांताची राजधानी कुनमिंग येथील लुओयांगझेन स्टेशनजवळ, रेल्वे ट्रॅकवर देखभालीचे काम करणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांचा ट्रेनच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी पहाटे घडली. भूकंपीय उपकरणांची चाचणी घेण्यासाठी एक विशेष ट्रेन ट्रॅकवरून जात होती. एका वळणदार ट्रॅकवरून ही ट्रेन वळत असताना, ट्रॅकवर काम करत असलेल्या मेंटेनन्स कर्मचाऱ्यांच्या गटाला तिने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ११ कर्मचाऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघाताने चीनच्या विस्तृत रेल्वे नेटवर्कवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
नेमका अपघात कसा घडला?
राज्य माध्यमांच्या वृत्तानुसार, सकाळी लवकर भूकंपीय उपकरणांची तपासणी करण्यासाठी ही ट्रेन ट्रॅकवर धावत होती. ट्रेन एका वळणावर वेगात वळली. त्याचवेळी ट्रॅकवर देखभालीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गट तिथे उपस्थित होता. ट्रेन अचानक समोर आल्याने कर्मचाऱ्याना सावरण्याची संधी मिळाली नाही आणि ट्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. दुर्घटनेत ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले.
रेस्क्यू ऑपरेशन आणि चौकशी
हा अपघात होताच रेल्वे प्रशासनाने तात्काळ आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली. स्थानिक प्रशासन आणि वैद्यकीय पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआनुसार, अपघाताचे नेमके कारण काय आहे, हे शोधण्यासाठी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. ही मानवी चूक होती की तांत्रिक बिघाडामुळे दुर्घटना घडली, हे तपासाअंती स्पष्ट होईल. दरम्यान, स्टेशनवरील रेल्वे वाहतूक आता पूर्ववत झाली असून सेवा सुरळीत सुरू आहेत.
चीनमधील रेल्वे सुरक्षा
चीन जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक असल्याचा दावा करतो, जो १,६०,००० किलोमीटरहून अधिक क्षेत्र व्यापतो. मात्र, अलीकडच्या वर्षांत येथे काही विनाशकारी रेल्वे दुर्घटना घडल्या आहेत. २०११ मध्ये झेजियांग प्रांतात झालेल्या एका मोठ्या अपघातात ४० लोकांचा मृत्यू झाला होता आणि २०० हून अधिक जखमी झाले होते. २०२१ मध्ये गांसु प्रांतातही लान्झोउ-शिनजियांग रेल्वेवर ट्रेनच्या धडकेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता.