Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 17:43 IST2025-11-28T17:41:53+5:302025-11-28T17:43:25+5:30
Thailand Flood : थायलंडमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

फोटो - Reuters
थायलंडमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. दक्षिण थायलंडमध्ये मृतांचा आकडा १४५ वर पोहोचला आहे, पुरामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अधिकाऱ्यांनी म्हटलं की, पुराचं पाणी कमी होत असताना, विनाशाचं भयानक दृश्य समोर येत आहे.
थायलंडच्या आपत्ती निवारण आणि व्यवस्थापन विभागाने शुक्रवारी सांगितलं की, मुसळधार पावसामुळे दक्षिणेकडील १२ प्रांतांमध्ये पूर आला आहे, ज्यामुळे १२ लाखांहून अधिक कुटुंबं आणि ३६ लाख लोक प्रभावित झाले आहेत.
बँकॉकमध्ये पत्रकार परिषदेत सरकारी प्रवक्ते सिरिपोंग अंगकासाकुल्कियात म्हणाले की, पुरामुळे आठ प्रांतांमध्ये १४५ जणांचा मृत्यू झाला आहे. सोंगखला प्रांताला सर्वाधिक फटका बसला आहे, ज्यामध्ये ११० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. एपी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, पुराचं पाणी कमी होत असताना सोंगखला प्रांतातील मृतांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
दक्षिण थायलंडमधील सर्वात मोठं शहर असलेल्या हात याईमध्ये सर्वाधिक मृतदेह सापडले. आपत्ती विभागाने शुक्रवारी सकाळी वृत्त दिलं की बहुतेक बाधित भागात पाणी कमी झालं आहे, परंतु काही भागात पाण्याची पातळी अजूनही जास्त आहे. हवामान विभागाने दक्षिणेकडील भागात पाऊस कमी झाला आहे, परंतु काही भागात वादळाचा इशारा दिला आहे.
पुरामुळे दक्षिण थायलंडमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे, हजारो लोक अडकले आहेत, वाहतूक ठप्प झाली आहे आणि कमी उंचीच्या इमारती आणि वाहने पाण्याखाली गेली आहेत. व्हिडीओ आणि फोटोंमध्ये कोसळलेले रस्ते, कोसळलेले विजेचे खांब, वस्तू आणि जोरदार प्रवाहाने वाहून असंख्य गोष्टी दिसत आहेत, गाड्या देखील वाहून गेल्या आहेत.