'दहशतवादी संघटनेला आमच्या प्लॅटफॉर्मवर जागा नाही', फेसबुकनं तालिबानला केलं बॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 16:08 IST2021-08-17T16:06:16+5:302021-08-17T16:08:52+5:30
Afghanistan Crisis: अमेरिकन कायद्यांनुसार तालिबान एक दहशतवादी संघटना

'दहशतवादी संघटनेला आमच्या प्लॅटफॉर्मवर जागा नाही', फेसबुकनं तालिबानला केलं बॅन
वॉशिंग्टन: तालिबाननं स्वतःला अफगाणिस्तानमधील नवीन सरकार म्हणून घोषित केल असेल, पण फेसबुकनंतालिबानवर पूर्णपणे बंदी घातली आहे. अमेरिकेच्या कायद्यानुसार तालिबान एक दहशतवादी संघटना आहे आणि म्हणूनच आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर या संघटनेला आणि या संघटनेशी संबंधित अकाउंट्सवर बंदी घालत आहोत, अशी माहिती फेसबूककडून देण्यात आली.
फेसबुकने सांगितल्यानुसार, कोणत्याही दहशतवादी संघटनेला फेसबूकवर जागा नाही. आता तालिबान किंवा त्याच्याशी संबंधित कोणतेही अकाउंट किंवा पोस्ट फेसबुकवरुन हटवल्या जातील. अफगाणी भाषा समजण्यासाठी फेसबुकनं काही अफगाणी भाषा तत्ज्ञांची नियुक्ती केली आहे.
तालिबानकडून सार्वजनिक माफी जाहीर
अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबाननं त्यांच्या सरकारचा अजेंडा तयार करण्यास सुरूवात केली आहे. तालिबानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तालिबानच्या नव्या सरकारने सर्व नागरिकांना माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत महिलांनीही सरकारशी मिळून काम करावं असं आवाहन तालिबाननं केलं आहे.स्थानिक वृत्त एजेन्सीनुसार, इस्लामिक अमीरात कल्चरल कमिशनचे एनामुल्लाह यांनी एका टीव्ही चॅनेलवर मुलाखतीवेळी ही घोषणा केली.