Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 22:34 IST2026-01-01T22:34:28+5:302026-01-01T22:34:28+5:30
Pakistan Punjab Accident News: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या एका बस आणि व्हॅन यांच्यात भीषण अपघात घडला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व खेळाडू फैसलाबाद येथील 'युनिव्हर्सिटी ऑफ व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्सेस'चे विद्यार्थी होते. बुधवारी रात्री ते एका क्रीडा स्पर्धेतील विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी बसने लाहोरच्या दिशेने निघाले होते. मात्र, वाटेतच लाहोरपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या अड्डा फकीर दी कुल्ली परिसरात त्यांच्या बसला भीषण अपघात झाला.
बस आणि व्हॅनमध्ये समोरासमोर भीषण धडक
फैसलाबादचे उपायुक्त अली अकबर भिंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस आणि व्हॅनमध्ये झालेली धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. १५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये खेळाडूंचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर परिसरात खळबळ माजली.
२० हून अधिक जखमींवर उपचार सुरू
या अपघातात २० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य पूर्ण केले आहे.
क्रीडा विश्वावर शोककळा
विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निघालेल्या तरुण खेळाडूंचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्यामुळे युनिव्हर्सिटी ऑफ व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्सेससह संपूर्ण शैक्षणिक आणि क्रीडा विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मोठी शोककळा पसरली आहे.