अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 19:51 IST2025-10-04T19:48:19+5:302025-10-04T19:51:20+5:30
अमेरिकेत भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली.

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
Telangana Student Death in US: परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या भारतीयांवर हल्ल्यांच्या घटना सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वप्ने पूर्ण करण्यासाठी परदेशात गेलेल्या आणखी एका तरुणाचे आयुष्य क्षणार्धात संपले. तेलंगणातील हैदराबादमधील एलबी नगर येथील रहिवासी पोल चंद्रशेखर यांची अमेरिकेतील डॅलस येथे दरोडेखोरांनी निर्घृणपणे गोळ्या घालून हत्या केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आलेल्या या तरुणाच्या मृत्यूने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कुटुंबाचा संपूर्ण विश्वास ज्याच्यावर होता तो मुलगा आता कायमचा गेल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
अमेरिकेतील डलास येथील पेट्रोल पंपावर काम करत असलेल्या २७ वर्षीय पोल चंद्रशेखर याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पीडित चंद्रशेखर पोल हा २०२३ मध्ये हैदराबाद येथून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत गेला होता. त्याने नुकतीच पदव्युत्तर पदवी पूर्ण केली होती आणि तो पेट्रोल पंपावर अर्धवेळ काम करत दुसरी नोकरी शोधत होता. त्यांच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर कुटुंबियांच्या डोळ्यांतील अश्रू थांबण्याचे नाव घेत नाहीयेत.
रात्रीच्या शिफ्टमध्ये एका अज्ञात बंदूकधाऱ्याने चंद्रशेखरवर गोळीबार केला. तपास सुरू असल्याने घटनेबाबत अधिक माहिती मिळण्याची कुटुंबिय वाट पाहत आहे. पोल यांच्या कुटुंबाने त्याचे पार्थिव मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडे मदत मागितली आहे. हैदराबादमध्ये, बीआरएस आमदार सुधीर रेड्डी आणि माजी मंत्री टी. हरीश राव यांनी कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, काही अज्ञात दरोडेखोरांनी पहाटे गॅस स्टेशनमध्ये लुटण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. यावेळी चंद्रशेखरच्या छातीत दोन गोळ्या लागल्या आणि तो रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डॅलस पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. ही बातमी कुटुंबापर्यंत पोहोचताच घरच्यांना धक्का बसला. आई रडत होती आणि वडील भिंतीला टेकून शांतपणे बसले होते, जणू त्याचे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाले आहे.