"...तर मुंबई-दिल्लीवर बॉम्ब टाका"; अब्दुल बासित यांचं वादग्रस्त विधान, भारत-पाक तणावात भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 21:10 IST2026-03-21T21:09:47+5:302026-03-21T21:10:49+5:30
Abdul Basit: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताबाबत एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे.

"...तर मुंबई-दिल्लीवर बॉम्ब टाका"; अब्दुल बासित यांचं वादग्रस्त विधान, भारत-पाक तणावात भर
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताबाबत एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. एका काल्पनिक परिस्थितीचा दाखला देत बासित यांनी म्हटले की, "जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला. तर, पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून भारताला लक्ष्य केले पाहिजे."
एका चर्चेदरम्यान बोलताना बासित यांनी ही गरळ ओकली. ते म्हणाले की, "कल्पना करा, जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला. तर, पाकिस्तानने गप्प न बसता मुंबई आणि दिल्लीसारख्या भारतीय शहरांवर बॉम्बफेक करावी." बासित यांच्या या विधानामुळे राजनैतिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, एका जबाबदार पदावर राहिलेल्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने दोन अण्वस्त्रधारी शेजारी देशांमधील तणाव वाढवणारे असे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अमेरिकेच्या संभाव्य कारवाईचा बदला भारतावर काढण्याचे बासित यांचे विधान तर्कहीन मानले जात आहे. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण असताना, अशा विधानांमुळे दक्षिण आशियातील शांतता धोक्यात येऊ शकते. बासित यांनी थेट मुंबई आणि दिल्ली यांसारख्या मोठ्या महानगरांचा उल्लेख केल्याने भारताच्या सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
अब्दुल बासित हे यापूर्वीही त्यांच्या भारतविरोधी वक्तव्यांसाठी चर्चेत राहिले आहेत. मात्र, थेट युद्धाची आणि बॉम्बफेकीची भाषा केल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानमधील अंतर्गत अस्थिरतेवरून लक्ष भरकटवण्यासाठी अशा प्रकारची विधाने केली जात असावीत.