सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:52 IST2026-04-08T13:51:24+5:302026-04-08T13:52:00+5:30
इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेहरानमधील भारतीय दूतावासाने नवीन सुरक्षा अॅडव्हायजरी जारी केली आहे. भारतीयांना त्वरित देश सोडण्याचे आदेश दिले असून महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच, आता भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने बुधवारी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची सुरक्षा अॅडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीयांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.
'त्वरीत देश सोडा', दूतावासाचा स्पष्ट इशारा
भारतीय दूतावासाने आपल्या नव्या पत्रकात म्हटले आहे की, "इराणमधील सद्यस्थिती आणि अलीकडील घडामोडी पाहता, सर्व भारतीय नागरिकांनी दूतावासाने सुचवलेल्या सुरक्षित मार्गांचा वापर करून लवकरात लवकर इराण सोडावे." विशेष म्हणजे, कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीमेकडे जाण्यापूर्वी दूतावासाचा सल्ला घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. परस्पर कोणताही निर्णय घेऊन सीमेवर जाण्याचा प्रयत्न करू नका, असेही दूतावासाने स्पष्ट केले आहे.
⚠️ Advisory as on 08 April 2026. pic.twitter.com/pusFQIAKKI
— India in Iran (@India_in_Iran) April 8, 2026
पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!
यापूर्वी दूतावासाने भारतीयांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या. "पुढील ४८ तास भारतीयांनी जिथे आहात तिथेच सुरक्षित राहावे. विजेची उपकरणे, लष्करी तळ आणि बहुमजली इमारतींच्या वरच्या मजल्यांपासून दूर राहा," असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, आता परिस्थिती बदलत असल्याने थेट देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. कोणत्याही महामार्गावर प्रवास करायचा असल्यास दूतावासाच्या निर्देशांशिवाय तो करू नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.
ट्रम्प यांची डेडलाईन आणि युद्धबंदीची घोषणा
एकीकडे भारतीय दूतावास अलर्ट मोडवर असताना, दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांच्या युद्धबंदीची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या मध्यस्थीनंतर ट्रम्प यांनी इराणवरील विनाशकारी कारवाई तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, होर्मुजची सामुद्रधुनी सुरक्षित ठेवण्याच्या अटीवरच ही स्थगिती देण्यात आली आहे.
भारतीयांसाठी हेल्पलाइन जारी
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी दूतावासाने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. समन्वय साधण्यासाठी भारतीय अधिकारी २४ तास संपर्कात असून, नागरिकांनी घाबरून न जाता दूतावासाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.